Shiv Sena UBT Dasara Melava | Uddhav Thackeray : कर्जमाफी ते राज-उद्धव युतीवरुन उद्धव ठाकरेंनी सरकारला ठणकावलं

Shiv Sena UBT Dasara Melava | Uddhav Thackeray : कर्जमाफी ते राज-उद्धव युतीवरुन उद्धव ठाकरेंनी सरकारला ठणकावलं

शिवसेनेचा दसरा मेळावा हा केवळ पक्षाचा कार्यक्रम नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा सोहळा मानला जातो. यंदा शिवाजी पार्कच्या मैदानात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यानेही तेच दाखवून दिलं.
Published by :
Prachi Nate
Published on

शिवसेनेचा दसरा मेळावा हा केवळ पक्षाचा कार्यक्रम नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा सोहळा मानला जातो. यंदा शिवाजी पार्कच्या मैदानात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यानेही तेच दाखवून दिलं. पावसाच्या सरी, चिखल, वाहतुकीची कोंडी – या सगळ्यावर मात करत हजारोंच्या संख्येने आलेल्या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांचं ऐकण्यासाठी मैदान गजबजून टाकलं.

उद्धव ठाकरेंचं भाषण हे नेहमीच त्यांच्या समर्थकांसाठी उत्साहवर्धक आणि विरोधकांसाठी अस्वस्थ करणारं असतं. यंदाही त्यांनी भाजपवर नेमके बाण सोडले. “हिंदुत्वाच्या नावाखाली आमच्या अंगावर येऊ नका, अन्यथा टोप्या घातलेले फोटो उघडे पाडू” हा त्यांचा इशारा ही फक्त वाक्यांची उग्रता नाही, तर भाजपच्या Hindutva-branding वर प्रश्नचिन्ह आहे.

भाजपने स्वतःला हिंदुत्वाचे एकमेव ठेकेदार समजून राजकारण करण्याची सवय लावली आहे. पण हिंदुत्व म्हणजे फक्त घोषणाबाजी, गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा आणि विरोधकांना देशद्रोही ठरवणं एवढंच असेल का? ठाकरे यांचा सवाल खरेच योग्य आहे. कारण हिंदुत्वाच्या नावाने लोकांमध्ये भीती निर्माण करायची आणि त्याच वेळी आसाममध्ये गोमांस खपवायचं – ही दुटप्पी भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला नजरेआड करता येणार नाही.

भाषणातील दुसरी ठळक गोष्ट म्हणजे ठाकरे यांचा नरेंद्र मोदींवरचा थेट हल्ला. “नवाज शरीफांच्या वाढदिवशी पाकिस्तानात केक खाणारे मोदी कोण? आणि मग आम्हाला देशप्रेम शिकवणार?” हा प्रश्न निव्वळ टोमणा नाही, तर भाजपच्या देशभक्तीच्या आभाळाएवढ्या दाव्याला उघडे पाडणारा आरसा आहे.

उद्धव ठाकरे यांनी शेतकरी प्रश्न, मणिपूरसारखी राष्ट्रीय संकटं आणि मुंबईचं भवितव्य या मुद्द्यांनाही हात घातला. त्यांनी केलेलं इशारा – “भाजपला मुंबई मिळाली तर ती अदानीच्या घशात घालतील” – हा फक्त राजकीय आरोप नसून, सामान्य मुंबईकरांच्या मनात आधीच निर्माण झालेल्या शंकेला शब्द देणारा आहे. विकासाच्या नावाने जमीन, इमारती, प्रकल्प कोणाच्या हातात जात आहेत, हे आता जनतेला कळायला लागलं आहे.

भाषणातलं आणखी एक महत्त्वाचं वाक्य म्हणजे – “जिथे मराठीचा प्रश्न येईल, तिथे आम्ही सगळं विसरून एकत्र येऊ.” हे विधान ठाकरे-राज ठाकरे यांच्यातील राजकीय समीकरणाला नवा रंग देतं. मराठी अस्मिता अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक ठरू शकते, आणि ठाकरे यांना हे पटलंय, हे स्पष्ट दिसतं.

या भाषणातून भाजपविरोधी मुद्दे, हिंदुत्वावरील प्रहार, मोदींवर थेट टीका आणि मराठी अस्मितेचा उल्लेख या सगळ्याचा संगम दिसतो. ठाकरे गटाने निवडणूक मोहिमेची सुरुवात कुठल्या दिशेने होणार हे कालच्या भाषणाने स्पष्ट केलं आहे.

मात्र प्रश्न असा आहे या मुद्द्यांनी मतदारांच्या मनात कितपत ठसा उमटेल? शिवसेना (ठाकरे गट) ला अजून संघटनात्मक मजबुतीची गरज आहे. भाजपकडे सत्ता, संसाधनं आणि प्रचारयंत्रणा आहे. अशा वेळी फक्त भाषणांच्या आगीने भाजपला रोखता येईल का?

एक गोष्ट मात्र निश्चित उद्धव ठाकरेंचं भाषण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाला तापवून गेलं आहे. हिंदुत्व, देशभक्ती आणि सत्तेचं राजकारण – या तिन्ही विषयांवर आता पुढची निवडणूक खेळली जाणार, यात शंका नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com