Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

नकली शिवसेना म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उद्धव ठाकरेंचा घणाघात, म्हणाले, "भेकड पक्षाचे नेते..."

काँग्रेससोबत नकली शिवसेना आहे, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्रपूरच्या सभेत केलं होतं. या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला.
Published by :

काँग्रेससोबत नकली शिवसेना आहे, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्रपूरच्या सभेत केलं होतं. या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. कालचं भाषण देशाच्या पंतप्रधानांचं नव्हतं. शिवसेनाप्रमुख कमळाबाई म्हणायचे. मी त्या पक्षाला (भाजप) भाकड, भेकड आणि भ्रष्ट पक्ष म्हणतो. कालचं त्याचं भाषण भाकड जनता पक्षाचं होतं. जर पंतप्रधान एका पक्षाचा प्रचार करायला लागले. तर घटनेवर हात ठेऊन आम्ही जी शपथ घेतो, त्या शपथेचा भंग होईल, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला. ते महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.

ठाकरे पुढे म्हणाले, कालचं भाषण भेकड पक्षाच्या एका नेत्याचं होतं. कारण ते त्या पक्षाचं अध्यक्ष सुद्धा नाहीयत. मी पंतप्रधानपदाविषयी टीका करत नाही. जेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली, तेव्हा मोदी कदाचित हिमालयात असतील. बाहेरच्या माणसानं महाराष्ट्राच्या जनतेला असली सेना आणि नकली सेना म्हणायचं, हा कहर झालाय. ह्यांचा पक्ष हा खंडणीखोर पक्ष आहे. निवडणूक रोखांचा विषय समोर आला आहे. चंदा दो आणि धंदा लो, असं ह्याचं सुरु आहे. २०१९ साली तुमच्याच पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा शिवसेना प्रमुखांच्या फोटोसोबत लोटांगण घालायला मातोश्रीवर आले होते. तेव्हासुद्धा मीच होतो. आमची हीच शिवसेना होती.

वंचित तुमच्या सोबत नाही, याचा किती फटका बसणार, यावर बोलताना ठाकरे म्हणाले, मविआ अधिक व्यापक कशी होईल, त्यासाठी आम्ही प्रयत्न केले. प्रकाश आंबेडकर यांना काही जागा देऊ केल्या होत्या. पण दुर्देवाने ते शक्य झालं नाही. ते काहीही बोलले तरी आम्ही त्यांना काही उत्तर देणार नाही. प्रकाश आंबेडकरांबद्दल आजही आमच्या मनात प्रेम आहे. त्यांनीसुद्धा संविधान रक्षणासाठी मोठी भूमिका घ्यावी, असं आम्हाला वाटतं. भविष्यात काय होतंय, ते आम्ही पाहू.

संपूर्ण देशाच्या जनतेला नवीन वर्ष आनंदाचं, सुखाचं जाण्यासाठी शुभेच्छा आणि हुकूमशाही नष्ट होण्यासाठी शुभेच्छा देतो. युती किंवा आघाडी असेल आम्ही जागावाटपाबाबत शक्य तितकी चर्चा करतो. प्रत्येकाला समजून जागावाटप जाहीर करून प्रत्यक्ष निवडणूक जिंकायची आहे. तो क्षण आता आलेला आहे. जिंकण्याचं मोठं उद्दीष्ठ डोळ्यासमोर ठेवलं आहे. आपण कोणासाठी लढतोय ते डोळ्यासमोर ठेऊन जिंकावं लागतं. कुणाच्याही मनात कोणतेही प्रश्न राहिले नाहीत. सर्वजण जोमाने कामाला लागले आहेत, असंही ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com