Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

"मोदी तुम्ही माझ्याशी लढा, माझ्या आई-वडीलांचा अपमान केला, तर..."; उद्धव ठाकरेंनी PM मोदींना दिला इशारा

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान वाचवण्यासाठी आम्ही हातात मशाल घेऊन मैदानात उतरलो आहे. डोळे उघडे ठेऊन मतदान करा"
Published by :

Uddhav Thackeray On Narendra Modi : संपूर्ण देशात हुकूमशाहीविरोधात आगडोंब पेटला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान वाचवण्यासाठी आम्ही हातात मशाल घेऊन मैदानात उतरलो आहे. डोळे उघडे ठेऊन मतदान करा. मोदीजी मला तुमच्याबद्दल आदर होता. पण मोदींना जिथे जाईल तिथे फक्त उद्धव ठाकरे दिसतात. मोदी तुम्ही माझ्याशी लढा. तुम्ही कुणीही असाल, माझ्या आई-वडीलांचा अपमान केला, तर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे. ठाकरे शिर्डी येथे महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत बोलत होते.

नरेंद्र मोदींवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांच्या नकली मुलाला मी विचारत आहे, असं मोदी म्हणाले होते. पण मोदी बेअक्कली आहेत. त्यांनी माझ्या देवतासमान आई-वडीलांचा अपमान केला आहे. मोदीजी तुमच्यावर आई-वडीलांचे संस्कार झाले नसतील. माझ्यावर झाले आहेत. मी सुसंस्कृत घराण्यातील आहे. तुम्हाला तुमच्या आई-वडीलांचं नाव सांगायला लाज वाटत असेल, तुम्ही तुमच्या आईला नोटंबदीवेळी रांगेत उभं केलं.

मतदानासाठी तुम्ही ९० वर्षांच्या मातेला रांगेत उभं केलं. हे पाप तुम्ही केलं. तेव्हढा निर्दयी मी नाहीय. आमचं हिंदुत्व मातृदेव भवं-पितृदेव भवं असं आहे. तुम्ही जास्त बोलण्याचा प्रयत्न करु नका. बाळासाहेब बोलण्याआधी हिंदूहृदयसम्राट बोला, नाहीतर मी तुम्हाला शिकवणी लावतो. १७ तारखेला मोदी मुंबईत येत आहेत. शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या स्मारकाजवळ जाऊन नाक रगडतील आणि ढसाढसा रडतील.

जनतेला संबोधीत करताना मोदी म्हणाले, मशाल हातात घेऊन हुकूमशाहीला जाळून टाकायचं आहे. मी राज्याभर फिरत आहे. विरोधकांकडे रिकाम्या खूर्च्या असतात. आपल्या सभेला लोकांची गर्दी असते. त्यांना भाड्याने माणसं आणावी लागतात. त्यांना सर्व भाड्याचं घ्यावं लागत आहे. उमेदवारही भाड्याचे घ्यावे लागत आहेत. ही भाजपची वृत्ती आहे. भाजपसोबत आपण ३० वर्षे प्रामाणिकपणाने राहिलो. प्रत्येक ठिकाणी त्यांचा थेट उमेदवार असतो आणि एक छुपा उमेदवार असतो. तिरंगी लढाईचं चित्र रंगवतात. पण इकडे तिरंगी लढाई नाही, इकडे तिरंग्यासाठी लढाई आहे. तिरंग्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा दिल्लीला जाणार आहे.

मला शिर्डी मतदारसंघ नवा नाही. गेल्या दिवाळीच्या सुमारास मी शिर्डीत आलो होतो. दुष्काळ होता. पीकं सुकून गेली होती. मी आलो होतो, तेव्हा पाऊस आला होता. संपूर्ण पीकं करपून गेली होती. चटका लावणारा प्रश्न शेतकऱ्यांनी मला विचारला होता, तो आजही माझ्या मनात कोरला आहे. देशाचा अन्नदाता मला विचारत होता की उद्धवजी आता आम्ही खायचं काय? एव्हढी वाईट अवस्था या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची झाली. तरीसुद्धा कुणीही तुमच्याकडे ढुंकून बघायला तयार नाही. नीळवंडे धरण बांधून तयार झालं होतं, पण मोदींना उद्घाटनासाठी वेळ नव्हता. मोदींची तारीख मिळत नाही, म्हणून शेतकऱ्यांची पीकं करपून टाकली होती.

मी मुख्यमंत्री असताना नीळवंडे धरण, पाण्याच्या योजनांसाठी हजारो कोटी रुपये दिले, ते कुठे गेले? मोदीजी नगरला म्हणाले, हे धरण ५० वर्ष खोळंबलं होतं. ५० वर्ष लटकलेलं काम तुम्ही गद्दारी करून सरकार पाडल्यानंतर वर्षभरात झालं. दुसऱ्याचं पोरं कडेवर घ्यायचं आणि त्यावर आपला शिक्का मारायचा. ही भाजपची वृत्ती आहे. आपल्या विरोधातली मतं नासवायची कशी, हे भाजपला चांगलं कळतय. ही लढाई तिरंग्यासाठी आहे, लोकशाहीसाठी आहे. हुकूमशाहाविरोधातील एकसुद्धा मत नासता कामा नये. मत मशालीलाच मिळालं पाहिजे. अपक्ष उमेदवार उभे राहिले आहेत, त्यांना सुद्धा मी सांगतो, हे पाप करु नका, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com