Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

"माझ्या पाठीत नाही, मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत वार केला"; उद्धव ठाकरेंची PM मोदींवर घणाघाती टीका

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. ठाकरे पुण्यात संजोग वाघेरे यांच्या महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते.
Published by :

गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राला तुम्ही काय दिलं? तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवायचं आहे? ज्या शिवसेनेनं तुम्हाला पंतप्रधानपदापर्यंत पोहोचवलं, त्या शिवसेनेला तुम्ही नकली शिवसेना म्हणतायत. हा माझ्या पाठीत वार झाला नाही, मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत वार केला आहे. ज्या महाराष्ट्राने दोन्हीवेळा तुम्हाला ४० पेक्षा जास्त खासदार निवडून दिले, त्या महाराष्ट्राची अस्मिता जपणारी शिवसेना तुम्ही फोडून टाकायला निघाला आहात, राष्ट्रवादी फोडून टाकायला निघाले आहात, महाराष्ट्राचे उद्योगधंदे तुम्ही गुजरातला नेले, महाराष्ट्रानी आता तुमच्यावर काय म्हणून उपकार करायचे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, कुणी पाठीत वार केला तर, महाराष्ट्र वाघनखं कसा बाहेर काढतो, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. ठाकरे पुण्यात संजोग वाघेरे यांच्या महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते.

ठाकरे मोदींवर टीका करत पुढे म्हणाले, मोदींनी २०१४ आणि २०१९ ला जे मुद्दे ठरवले, ते आता त्यांना २०२४ मध्ये ठरवता येत नाहीत. कारण त्यांचं नशिब आता जनतेनं ठरवून टाकलं आहे. मोदींचं काय करायचं, ते तुम्ही ठरवलं आहे. मोदी आता मुंबईत रोड शो करत आहेत. आम्ही आता यांना रस्त्यावर आणलं आहे. ४ जूनला आणखी रस्त्यावर आहे. महाराष्ट्र लेचापेचांचा देश नाही. महाराष्ट्र मर्दांचा आहे. जो महाराष्ट्राला नडेल, त्याला महाराष्ट्र गाडेल. मुंबईत रोड शो करण्यापर्यंत तुमची वेळ आली आहे. मग दहा वर्षात तुम्ही काय कमवलं, जनतेचं प्रेम तुम्हाला का मिळालं नाही? नोटाबंदी करताना तुम्ही लोकांना सांगितलं, तुमच्या खिशात फक्त कागदांचे तुकडे राहतील, तसंच आता ४ जूनला तुम्ही पंतप्रधान नाही, तर फक्त नरेंद्र मोदी राहाल.

कारण इंडिया आघाडीचा पंतप्रधान होणार आहे. तुम्ही जसं नोटाबंदी केलं होतं, तसं महाराष्ट्र आता मोदींची नाणेबंदी करणार आहे. महिला न्यायाधीश नागरत्ना त्यांनी उघड सांगितलं आहे, नोटबंदी काळा पैसा पांढरा करण्याचा एक मार्ग होता. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती असं बोलत आहेत, तरी आम्ही यांच्या मागे जायचं का? सांगितलेल्या गोष्टी हे लोक विसरतात. म्हणून मी यांना मोदी सरकार म्हणत नाही, तर गजनी सरकार म्हणतो. २०१४ ला बोलले होते, १५ लाख रुपये तुमच्या खात्यात जमा होणार. अच्छे दिन आयेंगे, १५ लाख आले का तुमच्या खात्यात? १० हजार कोटींच्यावर भाजपच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.

निवडणूक रोखे जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे. हा घोटाळा करणारा नेता तिसऱ्यांदा तुमच्याकडे मतं मागायला येतो. देशाला दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचं आश्वासन तुम्ही दिलं होतं, पण ते पूर्ण केलं नाही. देशात महागाई वाढली आहे. काम करुनही नोकरीची शाश्वती नाही. आज काम आहे, उद्या काम नाही. कंत्राटी पद्धतीनं काम करायचं. तुम्ही अग्निवीर योजना ४ वर्षांसाठी आणता आणि स्वत:साठी पाच पाच वर्षांची मुदतवाढ मागताय. बाकी सर्व कंत्राटी पण मी मात्र कायमस्वरुपी. पण तुमचं सुद्धा कंत्राट आता आम्हाला संपवावं लागेल. मोदीजी तुम्हाला आम्ही ४ जूनला कंत्राटमुक्त करणार आहोत.

शरद पवार म्हणाले होते, छोटे प्रादेशिक पक्ष शिवसेनेत विलिन होतील. तोच मुद्दा घेऊन विरोधक टीका करत आहेत. पण शिवसेना हा काय छोटा पक्ष आहे का? बाप बदलण्याची गरज मला नाही. बाप बदलण्याची गरज तुम्हाला आहे. माझे वडील चोरून तुम्ही मतं मागता, तुमच्या वडीलांचं नाव सांगितलं तर लोक तुम्हाला दारात उभं करणार नाहीत. सरकार आपल्या दारी आणि लोक म्हणतील जा आपल्या घरी. या निवडणुकीत त्यांच्याकडे मुद्देच राहिले नाहीत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com