Uddhav Thackeray : "ही एकाधिकारशाही आहे आणि..."; उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा
Shivsena Uddhav Thackeray PC : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट शब्दांत सांगितले की, मराठी भाषेच्या अन्यायाविरोधात सर्व मराठी माणसांनी पक्षीय भेदाभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे. मराठी माणसावर अन्याय होत असेल, तर शिवसेना गप्प बसणार नाही, याची आठवण त्यांनी करून दिली. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मोर्चा करणार असल्याचे सांगितले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “शिवसेना या पक्षाचा जन्मच मराठीच्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी झाला आहे. आज सर्वांना कळत आहे की शिवसेना संपवण्यामागचा अजेंडा काय होता. मात्र, आम्ही स्पष्ट सांगतो, मराठी भाषा शिवसेना संपवू देणार नाही." हिंदीवर घालण्यात आलेली सक्ती तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी करत दिपक पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या आंदोलनाला शिवसेना पूर्ण पाठिंबा देणार असल्याचे ठाकरे यांनी जाहीर केले. “हे आंदोलन ही सुरुवात आहे. जोपर्यंत सक्ती मागे घेतली जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, "ही पाच मिनिटात मिटवता येईल अशी बाब आहे. मुख्यमंत्री जर ठरवतील की माझ्या राज्यात शाळेमध्ये हिंदी भाषा जबरदस्ती होणार नाही, तर हा विषय इथेच संपेल."
आमचा हिंदी भाषेला विरोध नाही, पण हिंदी सक्तीला ठाम विरोध आहे, हे स्पष्ट करत ठाकरे म्हणाले, “मुंबईतच हिंदी चित्रपटसृष्टी फुलली, आम्हाला हिंदीचा विरोध नाही. मात्र, सध्या एक छुपा अजेंडा राबवला जात आहे. ‘एक राष्ट्र, एक भाषा, एक विधान, एक निशाण’ – ही एकाधिकारशाही आहे आणि त्याला आमचा विरोध आहे.” मराठी रंगभूमीचं दालन उभारण्याचा निर्णय मी मुख्यमंत्री असताना झाला होता, पण सध्याच्या सरकारने तो रद्द करून ती जागा बिल्डरच्या घशात घातली, असा आरोपही त्यांनी केला. तसेच, “अजितदादा उपमुख्यमंत्री असताना तेही या भूमीपूजनास उपस्थित होते, मग आज गप्प का?” असा सवालही त्यांनी केला.
ठाकरे यांनी पुढे सांगितले, "आम्हाला नुसते सादरीकरण नको आहे, कृती हवी आहे. देश संघराज्य पद्धतीचा आहे आणि भाषेच्या आधारे राज्यांची मांडणी झाली आहे. त्यामुळे कोणतीही भाषा जबरदस्ती लादू नये. आज मला मराठी भाषेविषयी बोलावे आहे कारण तिच्यावर इतर भाषांचे अतिक्रमण सुरू आहे.” दिपक पवार यांना शिवसेनेचा सक्रिय पाठिंबा असून, सर्व राजकीय पक्ष, अभिनेते, खेळाडू, लेखक, कवी, पत्रकार आणि अस्सल मराठी जनतेने या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. “कोणी कितीही प्रयत्न केले तरी, हिंदी भाषेची सक्ती होऊ देणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.