गुंगाराम सरकारला जनतेने मोर्चाच्या माध्यमातून नोटीस दिलीय, बेकायदा सरकार कोसळणार; सामनातून हल्लाबोल

गुंगाराम सरकारला जनतेने मोर्चाच्या माध्यमातून नोटीस दिलीय, बेकायदा सरकार कोसळणार; सामनातून हल्लाबोल

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. त्यातच सत्ताधाऱ्यांकडून वारंवार वादग्रस्त वक्तव्याचे सत्र सुरु आहे. तर दुसरीकडे राज्यातील प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. याच सर्व विषयावरून महाविकास आघाडीकडून मुंबईत महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. या मोर्च्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा मोर्चा ‘नॅनो मोर्चा’ असल्याची टीका केली होती.

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा अग्रलेख सामनातून या टीकेवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान गिळून ढेकर देणारे सरकार महाराष्ट्रप्रेमी मोर्चेकरांचा असा अपमान करीत आहे. मोर्चा फेल झाला असे छाती पिटून विकट हास्य करीत आहेत. ही एक प्रकारची विकृती आहे.शनिवारचा मुंबईतील भव्य मोर्चा म्हणजे निवडणुका जिंकणारी ईव्हीएमची कलाकारी नव्हती. लाखभर जनता पदरमोड करून मुंबईच्या रस्त्यावर का उतरली? असे सामनातून म्हटले आहे.

शनिवारी मुंबईत निघालेला टोकदार आणि धारदार होता. हा मोर्चा निघू नये म्हणून राज्यातील गुंगाराम सरकारने नाना खटपटी केल्या. तरीही महामोर्चा निघालाच. या पुढेही आंदोलनाच्या तोफा धडधडत राहतील. मोर्चा यशस्वी झाला आहे. याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे फडणवीसांनी तळमळून सांगितलं मोर्चा फेल झाला. याचाच अर्थ मोर्चा भव्य होता. मोर्चा यशस्वी झाल्याने सरकार टरकले आहे, या मोर्चाने मिंधे-फडणवीस सरकारला नोटीस दिली आहे. तुमचा बेकायदा इमला कोसळत आहे, असे म्हणत सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे.

यासोबतच बऱ्याच काळाने मुंबईत महाराष्ट्र स्वाभिमान जागविण्यासाठी असा मोर्चा निघाला. मराठी माणसाचे संयमी, तितकेच रौद्र रूप या मोर्चाने पाहिले. आता राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस वगैरे मंडळींनी सांगितले की, ‘मोर्चा फेल गेला. अपयशी ठरला. हा महामोर्चा नव्हे; हा तर नॅनो मोर्चा!” ज्यांना या मोर्चाचे भव्य स्वरूप दिसले नाही त्यांच्या डोळ्यांत ‘मऱ्हाटी द्वेषा’चा वडस वाढला आहे. महाराष्ट्र अशा ‘गुंगारामां’च्या हाती सुरक्षित नाही व या गुंगारामांची झोप उडण्याची चिन्हे दिसत नाहीत, मात्र ती उडवावीच लागेल. मुंबईतील महामोर्चा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाआधी निघाला.महाराष्ट्रातील सध्याच्या मिंधे सरकारविरोधात मोर्चा निघाला हे लढ्याचे आणि संघर्षाचे पहिले पाऊल आहे. भविष्यात अशा अनेक पावलांखाली हे सरकार तुडवले जाईल. असे म्हणत टीका करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com