Ujjwal Nikam : राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी चार मान्यवरांची नियुक्ती; उज्ज्वल निकम यांच्यासह इतिहासकारांचा समावेश
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय संविधानाच्या अधिकाराचा वापर करत राज्यसभेसाठी चार क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना नामनिर्देशित केले आहे. या नव्या नियुक्त सदस्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून ओळखले जाणारे उज्जल देवराव निकम, केरळमधील ज्येष्ठ समाजसेवक आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते सी. सदानंदन मास्टे, परराष्ट्र व्यवहार विभागाचे माजी सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि ख्यातनाम इतिहासकार मीनाक्षी जैन यांचा समावेश आहे.
ही नेमणूक राज्यसभेतील राष्ट्रपती नामित जागांवरील रिक्ततेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असून, माजी सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
उज्ज्वल निकम यांचा जन्म 30 मार्च 1953 रोजी महाराष्ट्रातील जळगाव येथे झाला. त्यांचे वडील देवराव निकम हे वकील होते, तर आई विमलादेवी या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या कार्यकर्त्या होत्या. सुरुवातीस विज्ञान शाखेत पदवी मिळवलेल्या निकम यांनी नंतर जळगावच्या एस.एस. मणियार लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.
त्यांनी आपल्या दीर्घकालीन कारकिर्दीत अनेक गाजलेल्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून यशस्वी कामगिरी बजावली आहे. 1991 मधील कल्याण बॉम्बस्फोट प्रकरण, 1993 चा मुंबई साखळी बॉम्बस्फोट, तसेच 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यात अजमल कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यातही त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता.
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 80 नुसार, राज्यसभेत कमाल 250 सदस्य असू शकतात. यामध्ये 238 सदस्य राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून निवडून येतात, तर उर्वरित 12 सदस्यांना राष्ट्रपती नियुक्त करतात. ही नियुक्ती अनुच्छेद 80(1)(अ) आणि 80(3) अंतर्गत होते आणि त्यासाठी साहित्य, विज्ञान, कला किंवा सामाजिक कार्य अशा क्षेत्रांतील उत्कृष्ट योगदानाची अट असते.