Election Campaign : प्रचारसभेसाठी मैदानच मिळेना! शिवाजी पार्कवर ठाकरे बंधू विरुद्ध भाजप-शिंदेसेना
मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कवर आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रचारसभांबाबत राजकीय वर्तुळात मोठा तणाव निर्माण झाला आहे. निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांना प्रचारसभेसाठी मैदान मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी निवडून दिल्या जाणाऱ्या नगरसेवक आणि त्यांच्या नेत्यांना स्वतःच्या प्रचारासाठी मैदान उपलब्ध न होणे, मतदारांमध्येही प्रश्न निर्माण करत आहे. “ज्यांना स्वतःसाठी मैदान मिळत नाही, ते आमच्यासाठी काय मैदान मारणार?” असा आशयाचा प्रश्न मतदार करत आहेत.
येत्या १५ जानेवारीला होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी दादर येथील शिवाजी पार्क मैदान उपलब्ध होणे महत्त्वाचे ठरले आहे. या संदर्भात महापालिका अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, भाजप-शिंदेसेना युती तसेच उद्धवसेना-मनसे यांनी ११, १२, १३ जानेवारीसाठी शिवाजी पार्क मिळावा, यासाठी अर्ज केले आहेत. या अर्जांवर निर्णय घेण्याची जबाबदारी नगरविकास विभागाकडे आहे. सध्या अर्जांवर अंतिम निर्णय होणे बाकी असून, कोणत्या पक्षाला मैदान मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दादरमधील शिवाजी पार्क हे मैदान ऐतिहासिकदृष्ट्या राजकीय पक्षांच्या सभांचे साक्षीदार राहिले आहे. शिवसेनेच्या दसरा मेळावा किंवा मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यासारख्या कार्यक्रमांसाठी राजकीय पक्षांमध्ये नेहमीच चढाओढ राहते. सभेसाठी मोठ्या व्यासपीठाची उभारणी, झेंडे, मोठ्या स्क्रीनसाठी बांबू व उपकरणांची व्यवस्था करण्याची तयारी या पक्षांकडून केली जाते. त्यामुळे शिवाजी पार्कवर कोणत्या पक्षाची सभा होणार, हे राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ठाण्याच्या दौऱ्यावर राहून उल्हासनगर आणि कल्याण येथे प्रचार सभा आयोजित केली आहे. तसेच ठाण्यात सायंकाळी मुलाखतीचा कार्यक्रमही नियोजित आहे. शिवाजी पार्कसंदर्भातील अर्ज आणि निर्णयामुळे आगामी प्रचाराच्या शेवटच्या रविवारच्या कार्यक्रमांची रूपरेषा ठरवण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे.
शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी मैदान मिळेल की नाही, कोणत्या पक्षाला प्राधान्य मिळेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ठाकरे बंधू आणि भाजप-शिंदेसेनेच्या युतीच्या अर्जांवर नगरविकास विभागाचे निर्णय कधी येतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय दृष्टिकोनातून, शिवाजी पार्कवरील या चढाओढीमुळे महापालिका निवडणुकीतील राजकीय तापमान अधिक वाढण्याची शक्यता आहे.
