Raksha Bandhan : वलसाडमधील अनोखं रक्षाबंधन; बहीण सोडून गेली, पण तिच्या हाताने बांधली राखी
Unique Raksha Bandhan in Valsad : रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या प्रेमाचा उत्सव. पण यंदाच्या रक्षाबंधनात गुजरातमधील वलसाड येथे घडलेली एक घटना अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरली. गेल्या वर्षी सप्टेंबर 2024 मध्ये निधन झालेल्या रिया या लहान मुलीच्या जिवंत हाताने तिच्या भावाला राखी बांधली गेली आणि हा क्षण मानवतेचा संदेश देणारा ठरला.
रिया ही वलसाडची रहिवासी होती. तिचा ब्रेन डेड झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. रियाचे हात मुंबईतील 15 वर्षीय अनमता अहमद हिला प्रत्यारोपण करण्यात आले. अनमताने दोन वर्षांपूर्वी विजेचा धक्का लागल्यामुळे आपला हात गमावला होता. यंदा रक्षाबंधनासाठी अनमता मुंबईहून खास वलसाडला पोहोचली, केवळ रियाच्या भावाला, शिवमला, रियाच्या हाताने राखी बांधण्यासाठी. राखी बांधतानाचा तो क्षण भावूक करणारा होता. एका बाजूला बहिण गमावल्याची वेदना होती, तर दुसऱ्या बाजूला तिचा जिवंत हात पुन्हा भावाच्या मनगटावर राखी बांधत होता.
रिया व शिवमचे आईवडील अनमताला पाहून अश्रू अनावर झाले आणि त्यांनी तिला घट्ट मिठी मारली. या घटनेतून “धर्मापेक्षा मानवतेचा धर्म मोठा” हा संदेश अधोरेखित झाला. रिया चे मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसे आणि कॉर्निया देखील इतर रुग्णांना प्रत्यारोपित करण्यात आले असून तिच्या अवयवदानामुळे अनेकांचे जीव वाचले आहेत.