Donald Trump : अमेरिका भारतावरील टॅरिफ कमी करणार? ट्रम्प यांच्या सहाय्यकाचे संकेत
United States Secretary Scott Bessent On Pm Modi India and Donald Trump us 50 Tariffs Updates New Markets : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण 50 टक्के आयात शुल्क लागू केल्यामुळे भारतीय वस्तू अमेरिकेत निर्यात करताना मोठा आर्थिक भार पडत आहे. या निर्णयाचा परिणाम भारतातील अनेक उद्योगांवर होऊ शकतो, तसेच हजारो रोजगार धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांदरम्यान व्यापार करार होण्याची चर्चा होती, मात्र ती ठप्प झाल्याचे सांगितले जात होते.
27 ऑगस्टपासून लागू झालेल्या टॅरिफमुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. ट्रम्प यांनी वारंवार भारतावर टीका केली असून, त्यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. तरीही, आता ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांकडून आशावादी संदेश दिला जात आहे.
अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी भारत-अमेरिका व्यापार नातेसंबंधांबाबत सकारात्मक भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, “हे एक जटिल नातं आहे. ट्रम्प आणि मोदी यांचे संबंध चांगले आहेत, पण रशियन तेल खरेदीवर मतभेद आहेत. स्वातंत्र्यदिनानंतर आयात शुल्कावर चर्चा झाली होती, मात्र अजून करार अंतिम झालेला नाही. मला अपेक्षा होती की भारत हा करार करणाऱ्या पहिल्या देशांपैकी असेल, पण त्यांनी वाटाघाटी पुढे ढकलल्या.”
बेसेंट यांनी पुढे सांगितले की, “भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि अमेरिका ही सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. मला खात्री आहे की अखेरीस दोन्ही देश एकत्र येतील आणि पुढे वाटचाल करतील.” त्यांच्या या विधानामुळे भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत पुन्हा तर्कवितर्क सुरू झाले आहेत.