Sambhajinagar : अवकाळीचा मराठवाड्यात हाहाकार! ; वीज पडून दोघांचा मृत्यू, २२ जनावरे ठार
मराठवाड्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा कहर केला. सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यांसह पावसात वीज कोसळून दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून, २२ जनावरे दगावली आहेत. या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, जनजीवनही विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये कोठा कोळी येथे वीज कोसळून सचिन विलास बावसकर (वय ३०) व गणेश प्रकाश जाधव या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला असून, जखमीवर उपचार सुरु आहेत.
लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी वीज कोसळून १९ जनावरांचा मृत्यू झाला. जळकोट तालुक्यातील माळ हिप्परगा येथे एक म्हैस, उदगीर, औसा, लातूर, शिऊर, खुलगापूर आणि निलंगा तालुक्यातील अनेक गावे यामध्ये आहेत.
शेतकऱ्यांच्या म्हशी, बैल, शेळ्या आणि गायींच्या मृत्यूमुळे आर्थिक फटका बसला आहे. निलंगा तालुक्यातील शेडोळ, हालसी, अंबुलगा, धानोरा, बामणी, आणि येरोळ गावांमध्ये वीज कोसळून पशुधन मृत्युमुखी पडले. एका ठिकाणी सहा शेळ्या दगावल्याची घटना विशेष चिंता निर्माण करणारी आहे.
हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ ते ३१ मे दरम्यान छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अवकाळी पाऊस आणि वीज कोसळण्याच्या घटनांनी शेती आणि पशुपालनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. पिकांचे नुकसान तर झालेच आहे, पण जनावरांच्या मृत्यूमुळे दूध व्यवसायही संकटात आला आहे.