Washim Rain News : वाशिम जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले
राज्यात गेल्या चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले आहे . वाशिम जिल्ह्याला तर मुसळधार पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे . यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत असून बाजार समितीमध्ये ठेवलेल्या मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे .
मुसळधार पावसामुळे वाशीमच्या मनोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याचा माल पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत .दुपारच्या सुमारास पाऊस सुरु झाल्यानंतर काहीवेळात बाजार समितीच्या आवारात पाणी जमा झाल्याने शेतमाल देखील वाहू लागला. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ सुरु झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याच्या मालाला कमी किंमत मिळेल अशी शक्यता दर्शवली आहे.
पुढील तीन ते चार दिवस अमरावती आणि विदर्भात ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे या अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक आणि बागायत दारांना मोठा फटका बसण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे मात्र उन्हाळी मशागतीच्या कामांना खुप मोठा ब्रेक लागला आहे. भाजीपाला विक्री करणाऱ्यांवर अवकाळी पावसामुळे तर मोठं संकट उभे राहिले आहे. या अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले पाहायला मिळाले .