Donald Trump : 'युद्ध थांबले नाही तर परिणाम गंभीर'; डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड आणि कंबोडियाला इशारा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थायलंड आणि कंबोडियामधील सुरू असलेल्या युद्धाबाबत चिंता व्यक्त करत दोन्ही देशांना त्वरित युद्धविरामाचे आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत परस्थितीची तुलना केली.
26 जुलै 2025 रोजी ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ’वर पोस्ट करत या युद्धात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याचे नमूद केले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर युद्ध थांबवले गेले नाही, तर अमेरिका दोन्ही देशांसोबतचे व्यापार व्यवहार थांबवण्याचा विचार करू शकते.
शांततेसाठी दूरध्वनी संवाद
या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी थायलंडचे कार्यवाहक पंतप्रधान आणि कंबोडियाचे पंतप्रधान यांच्याशी स्वतंत्ररित्या संवाद साधला. त्यांनी दोघांनाही शांतीची गरज पटवून दिली. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, "दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित करणे ही केवळ गरज नाही, तर त्या भागातील समृद्धीसाठी एकमेव मार्ग आहे."
युद्धाचे मुळ कारण काय?
थायलंड आणि कंबोडियामधील संघर्षाचे मूळ कारण म्हणजे विहान मंदिराभोवतीचा जुना सीमावाद. गेल्या अनेक दशकांपासून हा वाद कायम असून, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशानंतरही तो सुटलेला नाही. सध्या दोन्ही देश एकमेकांवर रॉकेट, तोफा आणि हवाई हल्ल्यांच्या माध्यमातून जोरदार कारवाया करत आहेत.
थायलंडकडून लढाऊ विमाने वापरली जात असून, कंबोडियाने सीमा सुरक्षेसाठी स्फोटकांच्या जाळ्यांची मांडणी केली आहे. या भीषण युद्धामुळे आशिया खंडात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जागतिक संघर्षातील नवीन अध्याय?
रशिया-युक्रेन, इजरायल-गाझा, भारत-पाकिस्तान, इजरायल-इराण यांसारख्या संघर्षांनंतर थायलंड आणि कंबोडियातील संघर्ष हा आणखी एक गंभीर आणि संवेदनशील आंतरराष्ट्रीय मुद्दा ठरत आहे. ट्रम्प यांच्या सूचनेनंतर या युद्धात शांतता प्रस्थापित होईल का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.