Donald Trump vs PM Modi : भारतीय बाजारपेठेवर अमेरिकेचा दबाव; अटी न मानल्यास गंभीर परिणाम
Donald Trump : भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झालेला आहे. अमेरिकेकडून भारताला थेट इशारा देण्यात आला असून, भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत तर परिणाम गंभीर असतील असा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीच भारतावर तब्बल 50 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावून दबाव आणला होता. त्यानंतरही दोन्ही देशांमध्ये चर्चेचे प्रयत्न सुरूच आहेत. मात्र, चर्चेच्या दरम्यानही भारताला धमक्या दिल्या जात असल्याचे सूत्र सांगत आहेत.
नॅशनल इकोनॉमिक काऊन्सिलचे संचालक केविन हॅसेट यांनी स्पष्ट केले की, भारताने अमेरिकेच्या अटी न मानल्यास ट्रम्प प्रशासन कोणताही कठोर निर्णय घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. त्यांनी सूचित केले की, भारतीय बाजारपेठ अमेरिकन वस्तूंना बंदिस्त राहिली तर भारताला त्याचे मोठे नुकसान सहन करावे लागेल.
भारतातर्फे अमेरिकन वस्तूंवर काही निर्बंध आणले जात आहेत, असा अमेरिकेचा आरोप आहे. यामुळे अमेरिकन प्रशासन नाराज असून भारतावर दबाव वाढविण्याचे संकेत मिळत आहेत. याचबरोबर, भारत रशिया आणि चीनसोबत संबंध मजबूत करत असल्यानेही अमेरिकेचा रोख अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टॅरिफच्या पार्श्वभूमीवर ‘स्वदेशी वस्तू वापरा’ असा संदेश दिला आहे. मात्र, अमेरिकन वस्तूंवर मर्यादा आणण्याचे प्रयत्न सुरू राहिले तर वाईट परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा अमेरिकेकडून दिला जात आहे.