UTS App : 1 मार्चपासून यूटीएस अॅप बंद; रेल्वे प्रवाशांना ‘रेलवन’ सुपर अँपचा पर्याय

UTS App : 1 मार्चपासून यूटीएस अॅप बंद; रेल्वे प्रवाशांना ‘रेलवन’ सुपर अँपचा पर्याय

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून 1 मार्च 2026 पासून अनरिझर्व्हड तिकिटिंग सिस्टिम म्हणजेच यूटीएस (UTS) अॅप बंद करण्यात येणार आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून 1 मार्च 2026 पासून अनरिझर्व्हड तिकिटिंग सिस्टिम म्हणजेच यूटीएस (UTS) अॅप बंद करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे दररोज लोकल तसेच प्रवासी गाड्यांमधून जनरल तिकिटे किंवा प्लॅटफॉर्म तिकिटे ऑनलाइन बुक करणाऱ्या लाखो प्रवाशांवर परिणाम होणार आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे प्रवाशांना जनरल आणि प्लॅटफॉर्म तिकिटांसह इतर सर्व सुविधा ‘रेलवन’ या नव्या सुपर अॅपवर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे यूटीएस अॅप स्वतंत्रपणे वापरण्याची गरज उरणार नाही.

यूटीएस अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना तिकिट खिडकीवर रांगेत उभे न राहता मोबाईलवरूनच अनारक्षित तिकिटे खरेदी करण्याची सुविधा मिळत होती. विशेषतः मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक यांसारख्या शहरांमध्ये लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी हे अॅप अत्यंत उपयुक्त ठरले होते. मात्र आता या अॅपची सेवा थांबवून ‘रेलवन’मध्ये त्याचा समावेश करण्यात येणार आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, डिजिटल सेवा अधिक सुलभ आणि एकसंध करण्याच्या उद्देशाने ‘वन अॅप, ऑल सर्व्हिसेस’ ही संकल्पना राबवली जात आहे. रेलवन अॅपवर आरक्षित तिकिट बुकिंग, अनारक्षित तिकिटे, प्लॅटफॉर्म तिकिटे, ट्रेनची माहिती, लाईव्ह स्टेटस, तक्रार नोंदणी, तसेच इतर प्रवासी सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असतील. दरम्यान, काही प्रवाशांनी या निर्णयाबाबत संभ्रम व्यक्त केला आहे. यूटीएस अॅप वापरण्याची सवय झालेल्या प्रवाशांना नव्या अॅपशी जुळवून घेण्यासाठी काही काळ लागू शकतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना नवीन अॅप वापरताना अडचणी येऊ शकतात, अशीही चर्चा आहे.

रेल्वे प्रशासनाने मात्र प्रवाशांना आवाहन केले आहे की, 1 मार्चपूर्वीच ‘रेलवन’ अॅप डाउनलोड करून त्याची माहिती घ्यावी. संक्रमण काळात कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वेकडून मार्गदर्शक सूचना आणि हेल्पडेस्क सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एकूणच, रेल्वेच्या डिजिटल सेवांमध्ये मोठा बदल होणार असून यूटीएस अॅपचा अध्याय संपुष्टात येणार आहे. आता सर्वांचे लक्ष ‘रेलवन’ सुपर अॅप किती प्रभावी ठरते आणि प्रवाशांना कितपत सुलभ सेवा देते याकडे लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com