Uttar Pradesh Accident
Uttar Pradesh Accident

Uttar Pradesh Accident : उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये भीषण अपघात; 11 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील मोतीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी एक भीषण अपघात घडला.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Uttar Pradesh Accident) उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील मोतीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी एक भीषण अपघात घडला. सिहागाव-खरगुपूर रस्त्याजवळ एक बोलेरो जीप भरधाव वेगात शरयू कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत तब्बल 11 जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यातील बहुतांश जण एकाच कुटुंबातील होते. अपघातग्रस्त वाहनातील 4 जणांना स्थानिक नागरिकांनी वाचवले.

मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व जण गोंडामधील प्रसिद्ध पृथ्वीनाथ मंदिरात पाणी अर्पण करण्यासाठी निघाले असल्याची माहिती मिळत आहे. अचानक चालकाचे बोलेरोवरील नियंत्रण सुटले आणि कालव्यात कोसळली.घटनेच्या वेळी कालवा पूर्णपणे पाण्याने भरलेला होता. बोलेरो पाण्यात पडल्यावर काही क्षणातच संपूर्ण गाडी पाण्याखाली गेली. गाडीत बसलेले प्रवासी जीव वाचवण्यासाठी आतून दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करत राहिले, मात्र दरवाजे उघडले गेले नाहीत त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गाडीच्या खिडक्यांच्या काचा फोडून काही लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये 4 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर स्थानिक प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्यात मदत मिळाल्यानंतर गाडीत अडकलेले 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले. या मृतांमध्ये 6 महिला, 2 पुरुष आणि 3 लहान मुले आहेत.

अपघातातून वाचलेल्या एका मुलीने सांगितले की, ‘आम्ही सर्वजण मंदिरात जात होतो. आम्ही गाडीत भजन गात होतो. अचानक आमची गाडी घसरली आणि थेट कालव्यात पडली. त्यानंतर काहीच आठवत नाही. घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याची तात्काळ दखल घेतली असून, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदत व बचावकार्य राबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com