Vaibhav Naik On Rajan Salvi: राजन साळवी-उद्धव ठाकरेंच्या भेटीवर वैभव नाईक यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असताना, राजन साळवी यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मात्र आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबत एकनिष्ठ असल्याचे राजन साळवी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान मतदारसंघातील कामाबद्दल भेटीत चर्चा केली तसेच कार्यकर्त्यांच्या भावना उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
याचपार्श्वभूमीवर वैभव नाईक म्हणाले आहेत की, राजापूरचे माजी आमदार राजन साळवी हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. मागील १५ वर्षे साळवी हे शिवसेनेचे आमदार म्हणून काम करीत होते. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत निष्ठावंत शिवसैनिक म्हणून अडीच वर्षे काम केले आहे. मला खात्री आहे की, राजन साळवी हे शिवसेना सोडणार नाहीत.
पक्षाच्या अडचणीवेळी ते पक्षाच्या सोबत राहतील. त्यांच्या विरोधात जर वरिष्ठांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी काम केले असेल तर राजन साळवी यांनी उद्भव ठाकरे यांना सांगितले पाहिजे. निश्चितपणे उद्धव ठाकरे हे ज्यांनी राजन साळवी यांच्या विरोधात काम केले, त्यांच्यावर कारवाई करतील.
राजन साळवी यांना निष्ठावंत शिवसैनिक म्हणून जनसामान्यात जी किंमत आहे, ती इतर कुठे मिळणार नाही. तसेच मला आणि राजन साळवी यांना शिंदे गटाकडून लोकसभा निवडणुकीनंतर ऑफर आल्या होत्या. परंतु, आम्ही लोकांबरोबर राहिलो, निष्ठावंत म्हणून राहिलो. आज अनेक अडचणी आमच्यासमोर असल्या तरी आम्ही लोकांसोबत राहिलो आहोत. अशी प्रतिक्रिया वैभव नाईक यांनी दिली आहे.