Chhatrapati Sambhajinagar Crime : वैजापूरमधील महिला कीर्तनकाराच्या हत्येप्रकरणी परप्रांतीय आरोपींना अटक, कारण समोर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिंचडगाव येथील सदगुरु नारायणगिरी कन्या आश्रमात वास्तव्यास असलेल्या संगीता पवार या महिला कीर्तनकाराची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या धक्कादायक घटनेचा उलगडा आता पोलिसांनी केला असून, या प्रकरणी दोन परप्रांतीय आरोपींना अटक करण्यात आली आहे.
संगीता पवार या मागील दोन महिन्यांपासून संबंधित आश्रमात राहत होत्या. त्या अविवाहित असून, त्यांनी संन्यास स्वीकारला होता. आश्रम परिसरातच त्या आपला दिनक्रम पार पाडत होत्या. घटनेच्या दिवशी त्या आश्रमाच्या आवारातच बाहेर झोपल्या होत्या. त्यावेळी अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या डोक्यावर दगडाने वार करत क्रूर पद्धतीने हत्या केली होती.
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. विविध शक्यतांचा विचार करून पोलिसांनी चौकशीचा आराखडा तयार केला. तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे एक आरोपी वैजापूर येथून, तर दुसरा आरोपी मध्य प्रदेशातून अटक करण्यात आला. हे दोघेही परप्रांतीय असल्याचं निष्पन्न झालं असून, त्यांनी चोरीच्या उद्देशाने संगीता पवार यांच्यावर हल्ला केला असल्याची कबुली दिल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.
ही घटना केवळ चोरीपुरती मर्यादित न राहता महिला कीर्तनकाराच्या जीवावर बेतली, हे पाहता समाजमन सुन्न झाले आहे. एका अध्यात्मिक स्थळी अशा प्रकारची घटना घडणं हे दुर्दैवी असून, त्यामुळे आश्रम परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू असून, आरोपींकडून आणखी काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.