Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग वाढला; प्रवाशांची वाढ, उत्पन्नात विक्रमी भर
आरामदायी, वेगवान आणि अत्याधुनिक सोयींमुळे प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवास झपाट्याने वाढत आहे. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात तब्बल तीन कोटी प्रवाशांनी या गाड्यांचा लाभ घेतला असून, ७५ हजार ३६८ कोटी रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले. चालू वर्षात (जून २०२५ पर्यंत) प्रवासी संख्या आधीच ९३ लाखांवर पोहोचली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आहे.
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अजनी (नागपूर) – पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन होणार आहे. यासोबतच इतर दोन वंदे भारत गाड्यांनाही हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. नागपूर–पुणे मार्गावरील ही गाडी उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ, जळगाव आणि मनमाडसह अनेक प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या गाडीत वातानुकूलित डबे, स्वयंचलित तापमान नियंत्रण, आरामदायी आसन, आपोआप उघडणारे दरवाजे, मोठ्या खिडक्या, सीसीटीव्ही, आधुनिक शौचालये, संवेदक आणि स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा अशा अत्याधुनिक सोयी उपलब्ध आहेत. तसेच ‘कवच’ सुरक्षा प्रणालीही बसवण्यात आली आहे.
देशात १४४ वंदे भारत कार्यरत
३१ जुलै २०२५ पर्यंत देशातील विद्युतीकरण असलेल्या मार्गांवर १४४ वंदे भारत गाड्या धावत आहेत. गाड्यांचे मूळ व अंतिम स्थानक या आधारे त्यांची गणना केली जाते. महाराष्ट्रात सध्या २२ (अप-डाऊन मार्गासह) वंदे भारत कार्यरत असून, नागपूर–पुणे गाडीच्या सुरुवातीने हा आकडा २४ वर जाणार आहे.
कोरोनाकाळानंतर उत्पन्नात उसळी
कोविड-१९ काळात २०२०-२१ मध्ये वंदे भारत एक्स्प्रेसमधून केवळ १५,२४८ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले होते. त्यानंतरच्या काळात हे उत्पन्न सातत्याने वाढत गेले आणि २०२४-२५ मध्ये पाचपट वाढून ७५ हजार कोटींवर गेले. प्रवासी संख्येतही वाढ झाली असून, गतवर्षीच्या १०२.०१ टक्क्यांच्या तुलनेत यावर्षी ती १०५.०३ टक्के आहे.
महाराष्ट्रातील वंदे भारत मार्ग
राज्यातील वंदे भारत गाड्यांमध्ये नागपूर–सिकंदराबाद, हुबळी–पुणे, कोल्हापूर–पुणे, जालना–CSMT, बिलासपूर–नागपूर, मुंबई सेंट्रल–गांधीनगर, इंदूर–नागपूर, CSMT–साईनगर शिर्डी, CSMT–सोलापूर, CSMT–मडगाव, मुंबई सेंट्रल–अहमदाबाद अशा गाड्यांचा समावेश आहे. आता नागपूर–पुणे गाडीमुळे ही यादी आणखी वाढणार आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसची वाढती लोकप्रियता पाहता, भविष्यात आणखी नवीन मार्गांवर या गाड्या सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.