Vat Purnima Vrat 2025 : वटपौर्णिमा कधी होते साजरी? जाणून घ्या तिथी, महत्व आणि शुभ मुहूर्त...!
दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, याच दिवशी सावित्रीने आपला पती सत्यवान यांचे प्राण यमराजाकडून मागून घेतले होते. तिच्या निष्ठेने आणि समर्पणाने यमालाही नमते घ्यावे लागले. त्यामुळे या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात आणि निर्जल व्रत पाळतात.
वटपौर्णिमा 2025 मध्ये मंगळवार, 10 जून रोजी आहे. पंचांगानुसार, पौर्णिमा तिथीचा आरंभ 10 जून रोजी सकाळी 11.35 वाजता होणार असून ती 11 जून दुपारी 1.13 वाजेपर्यंत राहील. या दिवशी वटसावित्री व्रताच्या पूजेसाठी सर्वोत्तम मुहूर्त सकाळी 11.55 ते दुपारी 12.51 दरम्यानचा आहे. त्याशिवाय ब्रह्म मुहूर्तात सुरू होणारी पूजा अधिक फलदायी मानली जाते. सूर्योदयापासून दुपारपर्यंतची वेळही पूजेसाठी योग्य आहे.
वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे, घरातील देवांची पूजा करून व्रताचा संकल्प घ्यावा. पूजेसाठी वडाची पूजा करण्यासाठी आवश्यक साहित्य तयार ठेवावे. धूप, दीप, अगरबत्ती, हार-फुले, पाच प्रकारची फळे (मुख्यतः आंबा), सुवासिनीच्या शृंगाराचे साहित्य आणि वडाच्या झाडाभोवती बांधण्यासाठी पवित्र धागा. यावेळी स्त्रिया पारंपरिक वेशभूषेत जसे भरजरी साडी किंवा लग्नातील शालू, बांगड्या, मंगळसूत्र, टिकली, कुंकू, गजरा आणि पैंजण घालून पूर्ण साजशृंगार करतात. पूजेनंतर वडाच्या झाडाभोवती तीन किंवा सात प्रदक्षिणा घालून धागा गुंफतात, सावित्री-सत्यवानाची कथा ऐकतात.
व्रताच्या निमित्ताने काही स्त्रिया निर्जल उपवास करतात. वडाची पूजा झाल्यावर व्रत सोडले जाते. काहीजणी सूर्यास्तानंतर व्रत सोडतात. या व्रताचे पालन करताना पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. असे मानले जाते की, यादिवशी सावित्रीप्रमाणे व्रत पाळणाऱ्या स्त्रियांना त्यांचाच पती पुढील सात जन्मांसाठी प्राप्त होतो.
वटपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व अतिशय मोठे आहे. विवाहाच्या वेळी घेतलेले सप्तपदीचे वचन आणि पती-पत्नीमधील सात जन्मांचे बंध या सणात प्रखर्षाने अधोरेखित होतात. सावित्रीच्या दृढ निश्चयाने आणि भक्तीने तिचा पती मृत्यूच्या कुशीतून परत आला, ही कथा आजही विवाहित स्त्रियांना प्रेरणा देते. या दिवशी वटवृक्षाला केवळ झाड म्हणून नव्हे, तर एक पवित्र प्रतिक म्हणून पूजले जाते. कारण त्यात जीवन, सृष्टी आणि संरक्षण यांचे प्रतीक मानले जाते.
आधुनिक युगातही वटपौर्णिमा या सणाला तितक्याच भक्तिभावाने साजरे केले जाते. अनेक स्त्रिया या दिवशी पारंपरिक शृंगार करतात. नात्यांचा उत्सव साजरा करतात आणि आपल्या कुटुंबाच्या एकतेची प्रार्थना करतात. सोशल मीडियावरही या दिवशी विवाहित स्त्रियांचे पारंपरिक फोटो आणि श्रद्धेचा आविष्कार बघायला मिळतो. वटपौर्णिमा म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नव्हे, तर ती नात्यांची पुन्हा एकदा नव्याने ओळख करून देणारी आणि त्यांच्या घट्ट वीणीत श्रद्धेची गाठ बांधणारी दिव्य परंपरा आहे.