Bharati Gosavi : नाट्यक्षेत्रात शोककळा! ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांचे निधन
रंगमंचावर 58 वर्षे गाजवणाऱ्या, मराठी नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप पडणाऱ्या हरहुन्नरी कलाकार ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांचे वयाच्या 84 वर्षी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. नाट्य अभिनेते बाळ गोसावी यांच्या त्या पत्नी होत्या . आणि राजा गोसावी यांच्या त्या वहीनी होत्या. त्यांच्या मागे मुलगी नातं जावई असा परिवार आहे.
माहेरच्या दमयंती कुमठेकर म्हणजेच भारती गोसावी यांचा जन्म 22 जून 1941 मध्ये झाला. आई वडिलांना ही नाटकाची आवड असल्यामुळे त्यांच्यामध्ये ही नाटकाची गोडी निर्माण झाली. त्यांनी 1958 मध्येच सौभद्र नाटकातुन रंगभूमीवर पदार्पण केले. शंकर लोहकरे हे त्यांचे पहिले गुरु . पहिल्याच नाटकात त्यांना स्वरराज छोटा गंधर्व यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली.
संशय कल्लोळ, मानापमान अशा नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यांनी ऐतिहासिक नाटकांबरोबरच लोकनाट्य ,कौटुंबिक,राजकीय, सामाजिक अशा विविध आशयाची नाटके केली. भारती गोसावी यांचे लग्न नाट्य अभिनेते बाळ गोसावी यांच्यासोबत झाले. त्यांचे दीर राजा गोसावी हे नाटकात कार्यरत असल्यामुळे भारती यांची नाटकातील कारकीर्द लग्नानंतर ही अविरतपणे चालू राहिली. त्यांनी अत्रे थिएटर, कला वैभव चंद्रलेखा अशा विविध नाटक मंडळींसोबत काम केले आणि स्वतःच्या अभिनयाचा दबदबा कायम ठेवला.
वयाच्या 75 व्या वर्षी रंगभूमीवर 58 वर्ष पूर्ण केल्याबद्दल अखिल भारतीय नाट्य परिषद व भरत नाट्य संशोधन मंडळ यांनी 2016 मध्ये त्यांचा विशेष सत्कार केला होता. अखिल भारतीय नाट्य परिषद पुणे शाखेचा 2015 सालचा चित्तरंजन कोल्हटकर स्मृती पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. मानापमान , सुंदर मी होणार , लग्नाची बेडी, वाहतो ही दुर्वांची जुडी, खट्याळ काळजात घुसली , कुर्यात सदा टिंगलम या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आणि रसिकांच्या मनात राज्य करून गेल्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये एकूण सव्वाशेहून अधिक भूमिका साकारल्या.