ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन
साल २०२४ वर्ष सरता सरता एक दुख:द बातमी समोर आली आहे. पद्मभूषण पुरस्कार विजेते दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं वयाच्या ९० व्या वर्षी मुंबईत निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने बॉलीवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.
भारतीय फिल्म इंडस्ट्रीला मंथन आणि अंकुरसारखे दिग्गज चित्रपट देणारे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन झाले. श्याम बेनेगल हे दीर्घकाळ आजारी होते पण तरीही वेगवेगळ्या सिनेमासंदर्भात काम करत होते. श्याम बेनेगल यांचे सायंकाळी ६.३९ वाजता निधन झाले.
श्याम बेनेगल यांची मुलगी पिया बेनेगल हिने मृत्यू संदर्भात माहिती दिली. मुंबई सेंट्रल येथील वोकार्ट हॉस्पिटलमध्ये आज सायंकाळी ६.३८ वाजता त्यांचे निधन झाले. १४ डिसेंबर रोजी त्यांनी ९०वा वाढदिवस साजरा केला होता.
समांतर सिनेमांच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीत मोठं योगदान
सिनेमांसाठी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत तब्बल १८ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळवले होते. त्यांना १९७६ मध्ये पद्मश्री आणि नंतर १९९१ मध्ये भारताचा तिसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.