Ashok Saraf Padma Shri : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा 'पद्मश्री'ने सन्मान; राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान
"पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे. मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. माझ्या कुटुंबीयांचे, सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचेही आभार - तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं. तुमचा प्रेम आणि आशिर्वाद कायम असाच राहू द्या", अशी प्रतिक्रिया पद्मश्री पुरस्काराने सन्मानिक ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज, मंगळवारी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात भारतातील 68 प्रतिष्ठित व्यक्तींना पद्म पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी अभिनय सम्राट आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनाही राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळ्याला राष्ट्रपती भवनात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपतींनी 68 दिग्गजांना पुरस्कार प्रदान केले. दरम्यान, पुरस्कार वितरण सोहळ्याआधी अशोक सराफ ANI शी बोलताना म्हणाले की, "ही एक आनंदाची गोष्ट आहे, अशाप्रकारे सन्मान होणे ही एक मोठी बाब आहे. हा पुरस्कार एक उच्चस्तरीय सन्मान आहे. मला आनंद आहे की, या पुरस्कारासाठी मला पात्र समजण्यात आले, म्हणजे मी आयुष्यात नक्कीच काहीतरी काम केले आहे."