Vijay Mallya : विजय मल्ल्याला 4 महिन्यांची शिक्षा, 2000 रुपये दंड, सुप्रीम कोर्टाचा निर्णय
सर्वोच्च न्यायालयाने विजय मल्ल्याला (Vijay Mallya) अवमान प्रकरणी 4 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने मल्ल्याला 2000 रुपयांचा दंडही ठोठावला असून दंड न भरल्यास 2 महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार असल्याचे सांगितले आहे. इतकंच नाही तर विजय मल्ल्याकडून (Vijay Mallya) परदेशात हस्तांतरित केलेल्या $40 दशलक्ष डॉलर्सची रक्कम 4 आठवड्यात कोर्टाने भरायला सांगितली आहे.
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती यू यू ललित, न्यायमूर्ती एस रवींद्र भट्ट आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही थकबाकी न भरल्याने मल्ल्याविरोधात स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank OF India) अर्ज दाखल केला होता.
10 मार्च रोजी न्यायालयाने मल्ल्याच्या शिक्षेवरील निर्णय राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षांपूर्वी 9 मे 2017 रोजी विजय मल्ल्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवून अवमानाची कारवाई सुरू केली होती. विजय मल्ल्या (Vijay Mallya) यांनी ज्या बँका आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून कोट्यवधींचे कर्ज घेतले होते, त्यांच्या संपत्तीची संपूर्ण माहिती दिली नाही. या प्रकरणी बँका आणि अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 10 जुलै 2017 रोजी विजय मल्ल्या (Vijay Mallya) यांनी सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले.