Gautam Gambhir And Virat Kohli Viral Video
Gautam Gambhir And Virat Kohli Viral Video

कोहली-गंभीरच्या गळाभेटीवर सुनील गावसकरांचं मोठं विधान, म्हणाले; "गंभीरला 'ऑस्कर' द्या..."

गंभीरने थेट मैदानातच कोहलीची गळाभेट घेतली अन् सर्वांच्या भुवया उंचावल्या. या दोघांच्या गळाभेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Published by :

आरसीबीने दिलेल्या १८३ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाताच्या सुनील नारायण आणि फिलिप सॉल्टने सलामीला आक्रमक फलंदाजी केली. कोलकाताने १६.६ षटकांमध्ये ३ विकेट्स गमावून १८६ धावा करून सामना जिंकला. परंतु, या सामन्यात गौतम गंभीरने विराट कोहलीची गळाभेट घेतली अन् सर्वांच्या नजरा खिळल्या. गतवर्षी आयपीएलमध्ये गंभीर आणि कोहलीत मैदानावरच शाब्दिक चकमक झाली होती. त्यानंतर गंभीरला विराटच्या चाहत्यांनी ट्रोल केलं होतं. परंतु, यंदाच्या हंगामात काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. गंभीरने थेट मैदानातच कोहलीची गळाभेट घेतली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. या दोघांच्या गळाभेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सामना सुरु होण्याआधी स्टार स्पोर्ट्सने केकेआरचा माजी कर्णधार गौतम गंभीरची एक व्हिडीओ क्लीप शेअर केली. आम्हाला नेहमीच आरसीबीचा पराभव करायचा आहे, असं गंभीरने म्हटलं आहे. यावर रवी शास्त्री यांनी म्हटलं, विराट कोहली आणि गौतम गंभीर यांची गळाभेट झाल्यानं केकेआरला फेअर प्ले अवॉर्ड दिलं गेलं. तर सुनील गावसकर म्हणाले, फक्त फेअर प्ले पुरस्कार नाही, तर ऑस्कर पुरस्कारही दिला पाहिजे.

नेमकं काय घडलं?

मैदानात गौतम गंभीरने विराट कोहलीची गळाभेट घेतली. त्यानंतर विराटनेही गंभीरची गळाभेट घेतली. दोघेही हसले आणि एकमेकांशी चर्चा केली. हे पाहिल्यानंतर चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. गौतम गंभीर आणि विराट कोहली यांनी मैदानात सकारात्मक चर्चा केल्यानं क्रीडाविश्वात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दोघांमध्ये असलेला वाद मिटला असून सर्वकाही आलबेल असल्याचं नेटकरी प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com