Vishwajeet Kadam
Vishwajeet Kadam

सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी, विश्वजित कदमांची दिल्लीवारी, म्हणाले, "मविआच्या नेत्यांनी..."

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेण्यासाठी विश्वजित कदम दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे इतर कार्यकर्ते आणि विशाल पाटीलही आहेत.
Published by :

सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम दिल्लीवारी करत आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेण्यासाठी विश्वजित कदम दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे इतर कार्यकर्ते आणि विशाल पाटीलही आहेत. तत्पूर्वी, कदम यांनी माध्यमांशी संवाद साधत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, माझी भूमिका ठाम आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगलीच्या जागेचा निर्णय घ्यावा.

विश्वजित कदम पुढे म्हणाले, आज सांगलीत शिवसेनेची बैठक होत आहे. हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. आम्हाला आमच्या पक्षश्रेष्ठींकडून कोणत्याही सूचना मिळाल्या नाहीत. अशोक चव्हाण यांच्यामुळे सांगलीचा तिढा निर्माण झाला आहे, याबाबत मला माहिती नाही. मात्र, मागील काही महिन्यांपासून महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चा सुरू होत्या. त्यावेळी काँग्रेसच्या इतर नेत्यांसोबत अशोक चव्हाणही सहभागी होते. विशाल पाटील अपक्ष लढणार, यावर मी आता उत्तर देणार नाही.

उमेदवारीच्या शक्यतांबाबत मी आता काही बोलणार नाही. उमेदवारी मिळाली नाही, तर विशाल पाटील लढतील की नाही, यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील. मी कोणताही फॉर्म्युला दिलेला नाही. शिवसेनेने जो काही फॉर्म्युला दिला आहे. त्याबाबत माहिती करुन घेण्यासाठी आम्ही दिल्लीला जात आहोत. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी, अशी सांगलीतील जनतेची मागणी आहे आणि त्यासाठीच मी पक्षश्रेष्ठींकडे चर्चा करणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com