स्वयंघोषित सर्पमित्र तिघे जण सापाशी खेळले अन वनविभागात अडकले

स्वयंघोषित सर्पमित्र तिघे जण सापाशी खेळले अन वनविभागात अडकले

वर्धा जिल्ह्याच्या नाचणगाव येथे विषारी आणि बिनविषारी सापांशी छेडछाड करत सापांशी खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होताच वनविभागाने सापांशी खेळणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले.या तिघांविरुद्ध वनविभागाने वन्यजीव कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय.
Published by :
Siddhi Naringrekar

भूपेश बारंगे, वर्धा

वर्धा जिल्ह्याच्या नाचणगाव येथे विषारी आणि बिनविषारी सापांशी छेडछाड करत सापांशी खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होताच वनविभागाने सापांशी खेळणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले.या तिघांविरुद्ध वनविभागाने वन्यजीव कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय. मनीष निशिकांत घोडेस्वार, हर्षित मोहन मुन व लक्की महेश जांभूळकर तिन्ही रा. नाचणगाव असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.तीन दिवसांपूर्वी एका स्वयंघोषित सर्पमित्राचा विषारी सापाला चुकीच्या पद्धतीने हाताळल्याने मृत्यू झाला. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांना ब्रेक लावण्याच्या सूचना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठांनी दिल्या आहेत. वरिष्ठांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओ बाबत अधिकची माहिती घेतली असता तो वर्धा जिल्ह्यातील असल्याचे पुढे आले. इतकेच नव्हे तर विषारी आणि बिनविषारी सापाशी छेडछाड करणारे देवळी तालुक्यातील नाचणगाव येथील रहिवासी असल्याचे पुढे आले.

हे युवक नाचणगाव येथील असल्याच समोर येताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नाचणगाव गाठून त्यांना ताब्यात घेतले. शिवाय आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले. ही कारवाई उपवनसंरक्षक राकेश शेपट, सहाय्यक वनसंरक्षक अमरजित पवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलीय. नागरिकांनी कोणत्याही विषारी साप किंवा इतर वन्य प्राण्याला चुकीच्या पद्धतीने हाताळून जीवाशी खेळू नये. असे करणाऱ्या व्यक्तीस वन्यजीव संरक्षण अधिनियमाद्वारे सात वर्षांच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेस सामोरे जावे लागू शकते असे आवाहन वर्धा वनविभागाने केले आहे.

सापाशी खेळणाऱ्याचा झाला होता मृत्यू

वर्ध्यात सोनवाडी परिसरात मद्यधुंद अवस्थेत एका युवकाने बिन विषारी साप म्हणून विषारी मण्यार जातीचा साप पकडला.त्याला गळ्यात घेऊन फिरत होता त्यातच हातात पकडून फिरताना त्याला तीन ते चार ठिकाणी सापाने चावा घेतला मात्र तो मद्यधुंदीत असल्याने त्याला कळले नाही. त्याला उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.मण्यार जातीच्या सापाशी खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ही घटना ताजी असताना नाचणगाव परिसरात हे तिघे जण दोन सापाशी खेळत होते.त्याचा व्हिडीओ व्हायरल होताच वनविभागाने त्यांना ताब्यात घेतले. सापाशी खेळले जीवावर बेतू शकते त्यामुळे कोणीही सापाशी खेळू नये अशी माहिती वनविभागाने दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com