हिंगणघाटच्या वणा नदीतील खारडी - भारडी वाळू घाटावर पोलिसांची धडक कारवाई
भूपेश बारंगे|वर्धा: जिल्ह्यातील वाळू घाटावर मोठ्या प्रमाणात वाळूच उत्खनन केले जात आहे.शासनाचने वाळू घाटाचा लिलाव न करता अवैधरित्या वाळूची उपसा सुरू असल्याची माहिती पोलीस विभागाला कळताच स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत नऊ कोटी पाच लाखाचा मुद्देमाल जप्त केल्याने वाळू माफियात खळबळ उडाली आहे.
हिंगणघाट तालुक्यातील वणा नदीपात्रात खारडी - भारडी वाळू घाटात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार धाड टाकली या कारवाईत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. स्थानिक महसूल विभागाला डावलून कुठलीही माहिती न देता पोलिसांनी कारवाई केली. अवैधरित्या वाळूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 29 टिप्पर , तीन पोकलँड मशीन, सहा यांत्रिक बोटी व रेती गाळण्याचे साहित्य जप्त केले.ही कारवाई आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई होती.यामध्ये 9 कोटी 5 लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
दारोडा गावानजीक असलेल्या खारडी - भारडी वाळू घाटामध्ये अवैधरित्या वाळूची तस्करी केली जात होती.मात्र महसूल विभाग 'धृतराष्ट्र' भूमिकेत असल्याने याकडे कानाडोळा करत वाळू माफियांशी संगनमत करून वाळूची तस्करी केली जात असल्याची चर्चा नागरिक करत होते. हिंगणघाट, देवळी,पुलगाव, आष्टी,आर्वी या परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी केली जात आहे.प्रशासनाने कोणत्याही रेती घाटाचा लिलाव न करता अवैधरित्या वाळू उपसा केला जात असून रात्रीच्या सुमारास वाळू तस्करी केली जाते. यात खारडी - पारडी वाळू घाटावर वाळूची तस्करी करण्यासाठी एका मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा पाठबळ असल्याची सर्वत्र चर्चा होती.त्यामुळे महसूल विभाग कारवाई करण्यास पुढाकार घेत नव्हते अशी माहिती मिळाली आहे.या कारवाईत हिंगणघाटच्या एका मोठ्या नेत्याचा पोलिसांवर दबाव टाकण्याची शक्यता वर्तवली जात होती.मात्र पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता धडक कारवाई केल्याने सर्वत्र चर्चा रंगली होती. कारवाईतील वाहने वडणेर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात ठेवण्यात आले असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले, अमोल लगड, प्रमोद जांभुळकर, प्रमोद पिसे,अनिल कांबळे, अविनाश बनसोड, नितेश मेश्राम,रामकीसन इप्पर, पवन पन्नासे, नितीन इटकरे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, वनविभाग, वडणेर पोलिसांच्या सयूंक्त पध्दतीने कारवाई केली.
वाळू घाटातील कारवाईतील आरोपी कोण व कोणाला बसणार दंड?
वणा नदीपात्रात अवैधरित्या वाळूची दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असताना पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली.मात्र या मोठ्या कारवाईत अद्यापही कोणालाही अटक करण्यात आली नाही.त्यामुळे या कारवाईतील आरोपी कोण? कोणाला घेणार ताब्यात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तर महसूल विभाग नदीपात्रातील चोरीला गेलेल्या वाळूची पाहणी करत मोजमाप केली जात आहे. त्यानंतर दंड ठोठावण्यात येणार असल्याची माहिती आहे.त्यामुळे या कारवाईत किती जणांवर गुन्हे दाखल होते किंवा दंड ठोठावण्यात येते, हे कारवाईची पूर्तता झाल्यानंतर कळेल.या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असल्याचे सांगण्यात आले.