Mumbai water shortage : तांत्रिक अडचणींमुळे जलवाहिनी जोडणी विलंबली; मुंबईकरांचे हाल
मुंबई महापालिकेच्या जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे मंगळवारी मुंबईतील मोठा भाग पाण्याविना राहिला. सोमवारी सकाळपासून भूमिगत बोगदा शाफ्टसाठी ३,००० मिलीमीटर जलवाहिनीवर २,५०० मिलीमीटर जलवाहिनीची छेद-जोडणी सुरू करण्यात आली होती. हे काम मंगळवारी दुपारी चारपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती आधीच देण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचणी आल्याने काम रात्री उशिरापर्यंत चालू राहिले आणि त्याचा फटका थेट नागरिकांना बसला.
ए, बी, सी, ई, एफ-दक्षिण, एफ-उत्तर, एल आणि एन या वॉर्डांमध्ये मंगळवारी पूर्ण दिवस पाण्याचा थेंबही आला नाही. अनेकांनी पाणी साठवून न ठेवल्याने सकाळी आंघोळ, स्वयंपाक, धुणी-भांडी या सर्वच कामांवर परिणाम झाला. काहींचा दिवस अक्षरशः पाण्याशिवायच गेला. एम-पूर्व, एम-पश्चिम आणि एस विभागातही पाणीपुरवठा झाला, पण तो अत्यंत कमी दाबाने. त्यामुळे नागरिकांना पाणी मिळूनही उपयोग झाला नाही.
पूर्व उपनगरांत तर परिस्थिती अधिकच गंभीर होती. चेंबूर, कुर्ला, टिळकनगर, मानखुर्द, गोवंडी आणि घाटकोपर येथे पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहिला. या भागांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः भटकावे लागले. काही कुटुंबांना जेवणासाठीसुद्धा पाणी विकत आणावे लागले. झोपडपट्टी परिसरात पुरेश्या टाक्या नसल्याने समस्या अधिकच बिकट झाली. खारदेवनगर, सुभाषनगर, वाशी नाका, माहुल, पांजरापोळ आणि अणुशक्तीनगर परिसरात लोकांनी तासन्तास प्रतीक्षा करूनही पाणी मिळाले नाही.
पाणीपुरवठा बंद असल्यामुळे महापालिकेच्या मुख्यालयातील 9116 या हेल्पलाइनवर मंगळवारी सकाळपासून तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला. पाणी कधी सुरू होणार याविषयी विचारणारे कॉल सतत येत असल्याने कर्मचारी दिवसभर धावपळीत होते. दुपारी महापालिकेकडून ‘काम तांत्रिक कारणांमुळे लांबलं आहे’ असा संदेश मोबाईलवर आल्यानंतर नागरिकांचा संताप आणखीनच वाढला. मंगळवारी रात्री पाणी येणार की नाही, याबाबतची अनिश्चितता निर्माण झाली होती.
रात्री उशिरापर्यंत युद्धपातळीवर काम करून अखेर जोडणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. जलवाहिनीमध्ये पाणी भरायला किमान चार ते पाच तासांचा वेळ लागतो. त्यामुळे बुधवारी पहाटेपासून सर्व भागांत पाणीपुरवठा सुरळीत सुरू होणार असल्याची माहिती महापालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली आहे. मंगळवारचा दिवस पाण्याविना गेलेल्या मुंबईकरांना अखेर आज सुटकेचा श्वास घेता येणार आहे.

