MNS MVA Mumbai Morcha : विरोधकांच्या सत्याचा मोर्चाच्या प्रमुख चार मागण्या कोणत्या?
थोडक्यात
महाराष्ट्रात विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाची जोरदार चर्चा सुरू
विरोधकांच्या सत्याचा मोर्चाच्या प्रमुख चार मागण्या कोणत्या?
कोण कोण व्यक्ती होणार सहभागी?
निवडणूक आयोग आणि मतदान प्रक्रियेतील गोंधळाविरोधात विरोधकांनी महाएल्गार पुकारला आहे. सत्याचा मोर्चातून निवडणूक आयोगाला विरोधक शिंगावर घेणार आहेत. फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिकेपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता हा मोर्चा सुरू होणार आहे. या मोर्चासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर येथून स्लो लोकलने चर्चगेटपर्यंत प्रवास केला. ते या मोर्चाच्या दीड तास अगोदरच दाखल झाले आहेत. मोर्चाच्या तयारीची ते आढावा घेणार असल्याचे कळते.
मतदार याद्यांतील घोळाविरोधात सत्याचा मोर्चाची दुपारी 1 वाजता सुरुवात होणार आहे. या मोर्चासाठी राज ठाकरे हे अगोदरच दाखल झाले आहेत. त्यांनी लोकलने प्रवास केला. तर आता इतर नेतेही लवकरच दाखल होतील. शरद पवार हे दुपारी 12 वाजता या मोर्चासाठी निघतील. तर उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून निघतील. काँग्रेसचे नेते ही या मोर्चात दाखल होतील. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या मोर्चात दिसतील की नाही याची चर्चा सुरू आहे. डाव्या पक्षाचे नेतेही या मोर्चाच सहभागी होणार आहे. मुंबई महानगरपालिका मुख्य इमारती समोर पुण्यातून जागरण गोंधळ घालणारे दाखल झाले. संबळ वाजवून जागरण गोंधळाला सुरुवात झाली आहे .राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊ द्या शिवसेना आणि मनसेचे सरकार येऊ द्या यासाठी तुळजाभवानीकडे गोंधळी प्रार्थना करणार आहे.
या चार मागण्यांसाठी मोर्चाचे अस्त्र
विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मतदार याद्यांमध्ये हेराफेरी करून भाजप सरकार सत्तेवर आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने याविषयीची चर्चा, बैठका आणि पत्रकार परिषद घेऊन वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी यापूर्वी तीन वेळा पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीतील घोळावर प्रेंझेटशन केले आहे. त्यात त्यांनी देशातील कर्नाटक आणि महाराष्ट्रातील राजूरा विधानसभा मतदारसंघातील मतदानातील हेराफेरीचा आरोप केला. तर या चार प्रमुख मागण्या या मोर्चातून करण्यात येत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांसह महापालिका निवडणुकांच्या अगोदर मतदार याद्या अद्ययावत करा. त्या सदोष करा
मतदार याद्यातील घोळ संपल्याशिवाय, त्या सदोष झाल्याशिवाय पुढील सहा महिन्यापर्यंत कोणतीही निवडणूक घेऊ नका
मतदार याद्यांमधील दुबार नावं अगोदर हटवा
7 नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा
असा निघणार मोर्चा
सत्याचा मोर्चा हा फॅशन स्ट्रीट येथून दुपारी 1 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. मेट्रो सिनेमामार्गे हा मोर्चा मुंबई महापालिकेसमोर येईल. येथे या मोर्चाचे सभेत रुपांतर होईल. या ठिकाणी प्रमुख नेते मोर्चेकरांना, आंदोलकांना मार्गदर्शन करतील. या मोर्चाला पोलिसांनी अद्यापही परवानगी दिली नसल्याची माहिती समोर येत आहे.

