Hartalika : हरतालिकेवेळी केले जाणारे 'फुलेरा' म्हणजे काय? त्याच्याशिवाय हरतालिका व्रतही मानले जाते अपूर्ण...
हरितालिका व्रत हा सुहासिन महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि मंगल असा सण मानला जातो. या दिवशी शिव-पार्वतींची विशेष पूजा केली जाते आणि व्रताच्या प्रत्येक नियमाला धार्मिक महत्त्व असतं. पूजनात वापरल्या जाणाऱ्या सर्व सामग्रीत फुलेरा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो.
फुलेरा म्हणजे फुलं आणि पानांनी सजवलेली एक विशेष रचना. ती लहान चौथऱ्यावर, लाकडी आसनावर किंवा मंडपावर बांधली जाते. अनेकदा महिलावर्ग छोटे रोप पुजेत वापरून त्यालाही फुलेऱ्याचं रूप देतात. या फुलेऱ्यावरच शिव-पार्वतींची प्रतिकात्मक स्थापना होते. त्यामुळे त्याला पूजनाचा आधार मानलं जातं.
फुलेऱ्यात बांधलेल्या पाच फुलांच्या माळा भगवान शंकर-पार्वतींच्या पाच दिव्य कन्या जया, विषहरा, शामिलबारी, देव आणि दोतली यांचं प्रतीक मानल्या जातात. म्हणूनच त्याला व्रताचं आध्यात्मिक महत्व प्राप्त झालं आहे.
मान्यतानुसार, जर एखादी स्त्री व्रत पाळू शकली नाही, तरी फक्त फुलेऱ्याचं दर्शन केल्याने तिला शिव-पार्वतींचं आशीर्वाद मिळतो. इतकंच नव्हे, तर फुलेऱ्याचं दर्शन काशी किंवा सोमनाथ मंदिराच्या दर्शनाइतकं फलदायी मानलं जातं.
फुलेरा तयार करण्यासाठी विविध रंगांची फुलं तसेच आंबा, अशोक इत्यादी पानांचा उपयोग होतो. पूजनानंतर ही फुलं व पानं कधीही टाकली जात नाहीत; त्यांचं नदी किंवा जलप्रवाहात विसर्जन करणं आवश्यक असतं.
राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तर भारतातील अनेक भागांत फुलेऱ्याची प्रथा विशेष लोकप्रिय आहे. स्त्रिया एकमेकींचे फुलेरे पाहून आनंद घेतात आणि सजावटीत उत्साहाने सहभागी होतात. फुलेऱ्याशिवाय हरितालिका तीज व्रत अपूर्ण मानलं जातं. ते केवळ सजावट नसून दांपत्यसौख्य, समृद्धी आणि श्रद्धेचं प्रतीक मानलं गेलं आहे.