Rakshabandhan 2025 : यंदा राखी बांधण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणता? जाणून घ्या शुभ मुहूर्त, योग्य दिशा आणि विशेष योग
श्रावण पौर्णिमा हा दिवस बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणासाठी खास असतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या पवित्र सणाची उत्सुकता सर्वत्र दिसत आहे. बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात, तर भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो. यंदा रक्षाबंधन कधी साजरे करावे, कोणता मुहूर्त योग्य आहे आणि राखी बांधताना कोणत्या दिशेला बसावे, हे जाणून घेणे आवश्यक ठरणार आहे.
रक्षाबंधन 2025 कधी साजरे करायचे?
यंदा श्रावण पौर्णिमा 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2.12 पासून सुरू होईल आणि 9 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1.24 वाजता समाप्त होईल. मात्र 8 ऑगस्ट रोजी रात्रीपर्यंत भद्रा काळ असल्यामुळे या दिवशी राखी बांधणे टाळावे, कारण भद्राकाळात राखी बांधणे अशुभ मानले जाते. त्यामुळे 9 ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंधन साजरे करणे अधिक उत्तम ठरणार आहे.
राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त
9 ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस राखी बांधण्यासाठी शुभ ठरेल. विशेषतः सकाळी 5.21 पासून दुपारी 1.24 पर्यंतचा काळ अतिशय शुभ मानला जातो. ही वेळ साध्य झाली नाही तरी दिवसभरात कोणत्याही वेळी राखी बांधता येईल, कारण यंदा भद्राकाळाचा अडथळा नाही.
शुभ योगांचा संयोग
यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी सौभाग्य योग आहे जो १० ऑगस्टच्या रात्री २:१५ पर्यंत राहणार आहे. त्यासोबत सर्वार्थ सिद्धी योगही 10 ऑगस्ट रोजी सकाळी 5.47 पासून दुपारी 2.23 पर्यंत आहे. हे दोन्ही योग शुभफलदायी मानले जातात. तसेच श्रवण नक्षत्र देखील 2.23 वाजेपर्यंत राहणार आहे. करण म्हणून बाव आणि बलव हे उपस्थित असून, हेही शुभ संकेत देणारे आहेत. एकूणच, या दिवशी राखी बांधण्याचे धार्मिक, ज्योतिषशास्त्रीय आणि भावनिक दृष्टिकोनातून उत्तम संयोग साधले आहेत.
राखी बांधताना कोणती दिशा योग्य?
वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने ईशान्य दिशेला तोंड करून बसावे. म्हणजेच भावाचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे आणि बहिणीचे तोंड पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असावे. ही दिशा सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी मानली जाते.
कशी करावी रक्षाबंधनाची पूजा?
या दिवशी बहिणीने सकाळी लवकर उठून स्नान करून पूजेची तयारी करावी. पूजेच्या ताटात राखी, कुंकू, अक्षता, गोड पदार्थ आणि निरांजन ठेवावे. भावासाठी पाटाभोवती रांगोळी काढावी. भावाला पाटावर बसवून कपाळाला कुंकवाचा टिळा लावावा, त्याचे औक्षण करावे आणि त्याच्या मनगटावर राखी बांधावी. राखी बांधताना भावाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करत खालील मंत्र म्हणावा:
"ॐ येन बद्धो बली राजा, दानवेन्द्रो महाबलः
तेन त्वाम् प्रतिबद्धामि रक्षे माचलः माचल"
हा मंत्र राखीला एक शक्तिशाली आणि पवित्र रूप देतो. त्यामुळे केवळ भावाच्या मनगटावर धागा नाही, तर नात्याचा मजबूत धागा घट्ट बांधला जातो.
रक्षाबंधन म्हणजे नात्याची साजिरी पवित्रता
आजच्या धकाधकीच्या जीवनात, रक्षाबंधनसारख्या सणांनी माणसांमध्ये प्रेम, विश्वास आणि परस्पर जिव्हाळा जागवण्याचे काम केले आहे. राखी ही केवळ एक रेशमी दोरी नाही, तर त्यामध्ये बहिणीची भावना, काळजी आणि शुभेच्छांचा गहिरा ठेवा असतो. भाऊही या दिवशी बहिणीसाठी गिफ्ट देऊन आपल्या प्रेमाची पावती देतो.
यंदा रक्षाबंधन 9 ऑगस्ट रोजी शुभ योग, भद्राविना काळ आणि सकारात्मक दिशेच्या मार्गदर्शनाने अत्यंत मंगलमय वातावरणात साजरे होणार आहे. म्हणूनच, प्रेम, नातेसंबंध आणि परंपरेचा सण असलेल्या या दिवशी भावंडांमध्ये नव्याने प्रेमाचा धागा गुंफण्यासाठी हीच सर्वोत्तम वेळ आहे.