Sanjay shirsat : 'संघाच्या कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं?', संजय शिरसाटांचा संजय राऊतांना थेट सवाल
अभिनेता सलमान खान याने वरळीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यक्रमाला दिलेल्या उपस्थितीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. संघाच्या या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी समाजातील प्रभावशाली व्यक्तींच्या भूमिकेवर भाष्य करताना, सलमान खानसारखे कलाकार समाजात आदर्श ठरतात, त्यांच्या वेशभूषेचे व वागणुकीचे अनुकरण विद्यार्थी करतात, असे मत व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्याने आणि सलमान खानच्या उपस्थितीने राजकीय चर्चांना वेग आला आहे.
या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी संघावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सलमान खानला केवळ गर्दी जमवण्यासाठी बोलावण्यात आले होते का, की संघाची मुस्लिम समाजासाठी दारे खुली झाली आहेत, असा थेट सवाल त्यांनी केला. तसेच, संघ हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवण्यात सहभागी असल्याचा आरोप करत, सलमान खानच्या उपस्थितीमागील हेतूवर संशय व्यक्त केला.
राऊतांच्या या वक्तव्याला शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “संघाच्या कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं?” असा प्रतिप्रश्न उपस्थित करत, राऊत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला. एखादा कलाकार कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने संघाच्या विचारधारेत बदल होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संजय शिरसाट पुढे म्हणाले की, सलमान खान हा लोकप्रिय अभिनेता आहे, तो गणपती बसवतो, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होतो. त्याच्या उपस्थितीमुळे संघाची ओळख किंवा विचारधारा बदलत नाही. “संघाच्या कार्यक्रमांना याआधीही राष्ट्रपती, पंतप्रधान, विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्ती उपस्थित राहिल्या आहेत. मग केवळ सलमान खान आल्यामुळे आक्षेप का?” असा सवाल त्यांनी केला.
शिरसाट यांनी संजय राऊतांवर टीका करताना म्हटले की, समाजात सलोखा निर्माण होण्याऐवजी काही नेते सतत धर्म, जात आणि समाजात विष पेरण्याचे काम करत आहेत. संघाचा उद्देश समाजघटकांना एकत्र आणण्याचा आहे. कलाकार, खेळाडू किंवा विविध क्षेत्रांतील लोक जर अशा कार्यक्रमांना उपस्थित राहत असतील, तर त्याचा सकारात्मक संदेशच समाजात जातो, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, सलमान खानच्या उपस्थितीवरून सुरू झालेला हा वाद केवळ एका कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता, संघाची भूमिका, धर्मनिरपेक्षता, आणि समाजातील प्रभावशाली व्यक्तींची जबाबदारी या मुद्द्यांवर व्यापक चर्चा घडवून आणत आहे. एका बाजूला याला समावेशकतेचे प्रतीक मानले जात असताना, दुसऱ्या बाजूला राजकीय हेतूने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता या वादावर संघ किंवा सलमान खान स्वतः काय भूमिका घेतात, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या तरी सलमान खानच्या उपस्थितीने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
