Kanya Pujan 2025 : नवरात्रीत कन्या पूजन कधी करावे? सर्वकाही जाणून घ्या...
हिंदू परंपरेत नवरात्रीचे शेवटचे दिवस अत्यंत शुभ मानले जातात. या काळात कन्या पूजनाचा विशेष प्रघात आहे. असे मानले जाते की 2 ते 10 वर्षे वयोगटातील मुलींची पूजा केली की देवी दुर्गेची कृपा लाभते. नवरात्रीचे उपवास संपवताना कन्या पूजन केले जाते. त्यामुळे भक्ताला पापमुक्ती मिळते आणि जीवनात सुख, शांती व भरभराट येते असे शास्त्र सांगते.
या वर्षी नवरात्री 22 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. तृतीया तिथी दोन दिवस असल्याने नवरात्रीचे एकूण दहा दिवस मानले गेले आहेत. त्यानुसार अष्टमी 30 सप्टेंबरला तर नवमी 1 ऑक्टोबरला येते. अनेकजण अष्टमीला पूजन करतात तर काही नवमीला. त्यामुळे दोन्ही दिवसांपैकी कोणत्याही दिवशी मुलींना अन्नदान करून पूजन करण्याची परंपरा आहे. शक्य असल्यास नऊ मुलींची पूजा करावी. परंतु 3, 5 किंवा 7 मुलींचे पूजन केले तरीही ते पूर्ण मानले जाते. पूजनात एका मुलाचाही समावेश करावा, ज्याला बटुक भैरव म्हटले जाते.
कन्या पूजन करताना मुलींचे पाय धुऊन त्यांना आसनावर बसवले जाते. त्यांना तिलक लावून जेवण वाढले जाते. पूजेनंतर लाल कपडे, चुनरी, फळे किंवा सौंदर्यवस्तू भेट देणे शुभ मानले जाते. विशेषतः लाल रंग देवीला प्रिय असल्याने मुलींना लाल कपडे किंवा बांगड्या भेट दिल्यास सकारात्मक फळ मिळते. पूजनानंतर त्यांना तांदूळ किंवा जिरे कपड्यात बांधून दिल्यास घरात समृद्धी वाढते असे मानले जाते.
शास्त्रानुसार, कन्या पूजन सकाळपासून संध्याकाळपर्यंत करता येते. पण दुपारी 12 वाजण्यापूर्वी मुलींना जेवण देणे सर्वात उत्तम मानले गेले आहे. अष्टमी तिथी 29 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4:32 वाजता सुरू होईल आणि 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:07 वाजता संपेल. त्यानंतर लगेचच नवमी तिथी 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:08 वाजता सुरू होऊन 1 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7:02 वाजता संपेल. अष्टमी किंवा नवमी यापैकी कोणत्याही दिवशी कन्या पूजन करता येते. श्रद्धेनुसार विधी केल्यास भक्ताला देवी दुर्गेचे आशीर्वाद मिळतात. या पूजेमुळे घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदते असे धार्मिक मान्यता आहे.