Ajit Pawar : अजित पवारांच्या पार्थिवावर कुठे होणार अंत्यसंस्कार?

Ajit Pawar : अजित पवारांच्या पार्थिवावर कुठे होणार अंत्यसंस्कार?

महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल (मंगळवारी) विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल (मंगळवारी) विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. मुंबईहून बारामतीकडे येत असताना त्यांच्या खाजगी लिअरजेट ४५ (Learjet 45) या विमानाचा बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. लँडिंगच्या प्रक्रियेदरम्यान विमान कोसळले आणि काही क्षणांतच त्याला भीषण आग लागली. या दुर्घटनेत वैमानिकांसह विमानातील अन्य चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून राजकीय व सामाजिक क्षेत्रात कधीही न भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

नेमकं काय घडलं?

अजित पवार हे काल सकाळी एका महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धावपट्टीपासून काही अंतरावरच विमानाने पेट घेतला आणि जमिनीवर आदळले. अपघातानंतर तात्काळ बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीची तीव्रता इतकी भीषण होती की कोणालाही वाचवणे शक्य झाले नाही. काही मिनिटांतच संपूर्ण विमान जळून खाक झाले.

अंत्यसंस्कार कुठे होणार?

अजित पवार यांच्या निधनानंतर कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांना अश्रू अनावर झाले आहेत. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पार्थिवावर बारामतीमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील. दरम्यान, विद्या प्रतिष्ठान परिसरात प्रशासकीय तयारी सुरू असून अजित पवार यांचे मूळ गाव असलेल्या काटेवाडीतही हालचालींना वेग आला आहे. अंत्यसंस्काराची अंतिम जागा पवार कुटुंब ठरवणार आहे.

श्रद्धांजली आणि शोक

अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने लोकसभेत दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. बारामती आणि बीडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला असून बाजारपेठा, शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करत सर्व सरकारी सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com