Ajit Pawar : "आम्ही काय बिनडोक आहोत का?" चाकण दौऱ्यात अजित पवार संतापले; नेमकं असं काय घडलं?
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज चाकण शहर व एमआयडीसी परिसराच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान वाहतूक कोंडी, भूसंपादन, नागरी सुविधा अशा विविध स्थानिक समस्यांची थेट पाहणी त्यांनी केली. पहाटेपासूनच नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संवाद साधत पवारांनी समस्यांवर उपाययोजना ठरवल्या. मात्र, या दौऱ्यात त्यांच्या खास शैलीतील फटकारे आणि घोषणा दोन्ही पाहायला मिळाल्या.
शिरूर येथील एका कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार अचानक एका व्यक्तीवर चिडले. मध्येच बोलणाऱ्या त्या व्यक्तीला त्यांनी थेट सुनावलं, यावेळी अजित पवार म्हणाले की, “आम्ही काय बिंडोक आहोत का? तुम्हाला लय कळतंय का? एवढी सगळी कामं केली, आज इथे साडेसहा वाजता आलो आणि तुम्ही मध्ये बोलताय. आम्ही आठ वेळा निवडून आलो आहोत. आज या शाळेला 300-400 कोटी रुपयांची कामं मंजूर केली आहेत.
मला सगळं माहित आहे, पण काही ठिकाणी स्थानिक लोक नाराजी व्यक्त करतात. उद्या अतिक्रमण काढायला लागलो तर पुन्हा नाराजी केली जाते. ”एमआयडीसी परिसरातील नागरिकांनी ‘चाकणला बारामतीसारखं करा’ अशी मागणी केली असता, अजित पवारांनी दोन्ही शहरांची तुलना करण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केलं. तरीही, सुविधांच्या दृष्टीने चाकणचा विकास व्हावा यासाठी ठोस पावलं उचलण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
दौऱ्यातील सर्वात महत्त्वाची घोषणा करताना अजित पवार म्हणाले, “चाकण महानगरपालिका करण्याची चिन्हं दिसत आहेत. वाकवस्ती लोणी काळभोर, वाघोली, मांजरी (दोन्ही), फुरसुंगी,उरळी देवाची, हिंजवडी या भागांचा समावेश करून स्वतंत्र महानगरपालिका करावी लागेल. तसेच वरच्या भागासाठीही एक महानगरपालिका स्थापन करावी लागेल.” यामुळे पुणे जिल्ह्यात आगामी काळात नव्या महानगरपालिका स्थापन होण्याची शक्यता आहे.
चाकण चौकात वाहतूक कोंडीची पाहणी करताना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एक वाहन थांबवलं होतं. यावर पवारांनी नाराजी व्यक्त करत पोलिसांना सुनावलं. “पाणी असेल तर फ्रिजला लागतं का? आमचे भूसंपादनाचे प्रश्न आहेत, ट्रॅफिकची कामं नीट करायला हवीत. मूर्खासारख्या गाड्या का अडवता? ट्रॅफिक चालू द्या.
मागे आपण मिटिंग घेतली होती, तरीही गाड्यांना स्पेस मिळाली नाही. हे कॉंक्रिटचं काम लवकर पूर्ण करा.” दिवसभराच्या या दौऱ्यात अजित पवारांनी स्थानिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकल्या, अधिकारी आणि पोलीस यांना थेट सूचना दिल्या आणि महत्त्वाच्या विकास प्रकल्पांबाबत आश्वासनं दिली. त्यांच्या या दौऱ्यात तिखट भाष्य, थेट आदेश आणि मोठ्या घोषणांचा संगम पाहायला मिळाला.