Paltan Doctor Case : प्रकरणात नवे वळण; पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; SIT चौकशीची मागणी
(Phaltan) फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यूने राज्यभर खळबळ उडवली असताना आता या प्रकरणात नवे वळण आले आहे. आरोपींनी पुरावे नष्ट करून आत्मसमर्पण केल्याचा आरोप पुढे आला असून, मृत डॉक्टरचे मूळ गाव वडवणी (जि. बीड) येथे संतापाचा उद्रेक झाला आहे. गावकऱ्यांनी कडकडीत बंद आणि रस्ता रोको आंदोलन छेडत, या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक (SIT) मार्फत व्हावी, अशी जोरदार मागणी केली आहे. कुटुंबियांचा ठाम आरोप आहे की, डॉक्टरने आत्महत्या केलेली नसून तिची हत्याच करण्यात आली आहे. मृतदेहावर आढळलेली जखमेची खुणा आणि आत्महत्येच्या परिस्थितीतील विसंगती यावरून संशय अधिकच गडद होत आहे. “माझ्या मुलीने टोकाचं पाऊल उचललं नाही, तिला मारण्यात आलं,” असे विधान तिच्या वडिलांनी करत न्यायाची मागणी केली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर आरोपींनी पुरावे नष्ट करून स्वतःहून आत्मसमर्पण केल्याची चर्चा असून, यामुळे नागरिकांचा आक्रोश अधिक वाढला आहे. वडवणीत आज व्यापार, वाहतूक आणि शासकीय कामकाज बंद ठेवण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले असून, “SIT चौकशीशिवाय न्याय नाही” या घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. गावकऱ्यांकडून करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये, या प्रकरणाची निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी आणि SIT मध्ये महिला आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, या दोन मागण्या विशेषत्वाने पुढे येत आहेत. आंदोलन शांततेत पार पाडण्यात आले असले तरी, जनतेत संताप स्पष्टपणे जाणवत आहे.
या प्रकरणाने केवळ फलटण किंवा वडवणीपुरतेच नव्हे, तर संपूर्ण राज्य हादरले आहे. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या मृत्यूने महिला सुरक्षेचा प्रश्न आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील दबावाचे वातावरण या दोन्ही मुद्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्य सरकारकडून अजून अधिकृत SIT स्थापन झालेली नसली, तरी आंदोलन आणि लोकमताचा वाढता दबाव लक्षात घेता सरकार लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. वडवणीच्या रस्त्यांवर सध्या एकच घोषणा घुमते आहे, “आमच्या डॉक्टरला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही!”

