Mohan Bhagwat : सरसंघचालक कोण बनू शकतो? मोहन भागवत यांचे एका शब्दात स्पष्ट उत्तर

Mohan Bhagwat : सरसंघचालक कोण बनू शकतो? मोहन भागवत यांचे एका शब्दात स्पष्ट उत्तर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात संघाच्या भूमिकेबाबत आणि सध्याच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीवर अत्यंत स्पष्ट आणि परखड मते मांडली.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात संघाच्या भूमिकेबाबत आणि सध्याच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीवर अत्यंत स्पष्ट आणि परखड मते मांडली. विशेषतः “सरसंघचालक कोण बनू शकतो?” या प्रश्नावर त्यांनी दिलेले उत्तर सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहे.

मोहन भागवत यांनी ठाम शब्दांत सांगितले की, सरसंघचालक हा केवळ हिंदूच असतो, मात्र त्यासाठी कोणतीही जात अडसर ठरत नाही. “तो ब्राह्मण असायलाच हवा, असे काही नाही. सरसंघचालक एससी, एसटी किंवा कोणत्याही समाजातील असू शकतो, फक्त तो हिंदू असला पाहिजे,” असे स्पष्ट विधान त्यांनी केले. संघामध्ये व्यक्तीची निवड जात, वर्ग किंवा पार्श्वभूमीवर नव्हे, तर संस्कार, निष्ठा आणि कामाच्या क्षमतेवर केली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवृत्तीच्या मुद्द्यावर बोलताना मोहन भागवत म्हणाले, “संघ सांगेल तेव्हा मी निवृत्त होईन. मात्र निवृत्तीनंतरही काम थांबत नाही.” संघ ही व्यक्तीपेक्षा मोठी संस्था असून, येथे पदापेक्षा कार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “जिभेखाली दात आले म्हणून कोणी जीभ कापत नाही,” या रूपकातून त्यांनी अनुभव आणि वयाच्या भूमिकेवर भाष्य केले.

भ्रष्टाचारावर परखड भाष्य

भ्रष्टाचाराबाबत बोलताना मोहन भागवत यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली. “भ्रष्टाचार हा व्यवस्थेत नसून माणसाच्या मनात असतो,” असे त्यांनी सांगितले. पाण्यात मासे पाणी कसे पितात हे दिसत नाही, तसेच काही सरकारी कर्मचारी पैसे कसे खातात हेही कळत नाही, असा टोला त्यांनी लगावला. त्यामुळे केवळ व्यवस्था बदलून भ्रष्टाचार संपणार नाही, तर मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

रोजगाराबाबत स्पष्ट भूमिका

रोजगाराच्या मुद्द्यावरही संघप्रमुखांनी ठाम भूमिका मांडली. “विदेशी नागरिकांना रोजगार देणे टाळले पाहिजे. मात्र आपल्या देशातील मुस्लिम नागरिक असतील, तर त्यांना नक्कीच रोजगार द्या,” असे त्यांनी सांगितले. देशहिताला प्राधान्य देत स्वदेशी नागरिकांना संधी देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

समाज, कुटुंब आणि संस्कार

संघाच्या कार्यपद्धतीबाबत बोलताना मोहन भागवत म्हणाले की, संघाचे मुख्य काम संस्कार घडवणे हे आहे. शास्त्रांमध्ये कुटुंबातील मुलांची संख्या सांगितली असली तरी, अंतिम निर्णय हा संबंधित कुटुंबाचाच असतो, असे त्यांनी नमूद केले. “तुम्ही तुमचा देव निवडू शकता,” असे सांगत त्यांनी धार्मिक स्वातंत्र्यालाही अधोरेखित केले. संघावर टीका करणाऱ्यांबाबत बोलताना त्यांनी एक अनुभव सांगितला.

“संघाचे विरोधक मला भेटायला आले. मी त्यांना सगळे समजावून सांगितले, तरीही काही प्रश्न अनुत्तरित राहिले,” असे त्यांनी सांगितले. संघाचे काम समजून घ्यायचे असेल, तर प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, नुकताच अभिनेता सलमान खान यांनी एका आरएसएस कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानेही चर्चेला उधाण आले असून, संघाबाबत असलेली अनेक गैरसमज दूर होत असल्याचे संकेत यानिमित्ताने मिळत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com