हॅशटॅग्स वापरणं बंद करा, असं का म्हणाले Elon Musk?
तुम्ही जर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर म्हणजेच नवं एक्स वापरत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचे मालक, प्रसिद्ध उद्योगपती, स्पेसेक्सचे संस्थापक आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. एक्सच्या वापरकर्त्यांसाठी हा मोठा बदल असणार आहे.
तुम्ही एक्स वापरत असाल तर त्यावर प्रत्येक पोस्टवर हॅशटॅग्स वापरले जातात. मात्र, यापुढे हॅशटॅग्स आवश्यक नाहीत, वापरकर्त्यांना ते वापरणे थांबवण्याचे आवाहन इलॉन मस्क यांनी केलं आहे. मस्कच्या मालकीच्या कंपनीच्या xAI मधील Grok या एआय चॅटबॉटचा समावेश असलेल्या एका पोस्टला दिलेल्या उत्तरात मस्क म्हणाले की हॅशटॅग “कुरूप दिसतात”.
पाहा इलॉन मस्क यांनी नेमकी काय पोस्ट केली?
हॅशटॅग्स म्हणजे काय? ते का वापरले जातात?
हॅशटॅग या "#" चिन्हाने दर्शविला जातो. या चिन्हाला जोडून कीवर्ड वापरला जातो. हॅशटॅग हा सोशल मीडियाचा अविभाज्य भाग बनला आहे आणि विशिष्ट विषय किंवा थीमशी संबंधित पोस्टचे वर्गीकरण यामुळे करता येतं. किंवा यामार्फत एखादा विषय शोधण्यात मदत होते. विशेषत: एक्स आणि इन्स्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर वापरले जातात. X वर, हॅशटॅगमुळे वापरकर्ते ट्रेंडिंग विषय आणि त्यांच्याशी संबंधित ट्विटचे प्रमाण पाहू शकतात. हॅशटॅगमुळे सध्या एकूणच ट्रेंडिंग असलेले विषय कळतात.
मस्क यांच्या आवाहनामुळे X च्या अल्गोरिदम आणि कंटेट शोध यंत्रणेत बदल झाल्याचं कळतंय. हॅशटॅग 2007 पासून वापरात आहेत. वापरकर्त्यांना ट्रेंडिंग विषय आणि संभाषणांमध्ये व्यस्त ठेवण्यास मदत करण्यासाठी X ने प्रगत प्रणाली कार्यान्वित केली आहे. जी वापरकर्त्याने प्रदान केलेल्या हॅशटॅगवर विसंबून न राहता संबंधित कंटेट शोधता येतं. त्यामुळे आता एक्सवर हॅशटॅग्स वापरण्याची गरज नसल्याचं स्पष्ट होतं.