शिंदेंच्या दारातही जायला कमी करणार नाही, का म्हणाले जितेंद्र आव्हाड?

शिंदेंच्या दारातही जायला कमी करणार नाही, का म्हणाले जितेंद्र आव्हाड?

लोकशाहीच्या पॉडकास्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदेंबरोबरच्या मैत्रीवर भाष्य केलं आहे.
Published by :
shweta walge

लोकशाहीच्या पॉडकास्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदेंबरोबरच्या मैत्रीवर भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मला आनंदच झाला, असं वक्तव्य आव्हाडांनी केलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात फार जुनी मैत्री आहे. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मैत्रीत काहीसा दुरावा निर्माण झाला आहे.

लोकशाहीच्या पॉडकास्टमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर तुम्हाला आनंद झाला की तुमच्यासाठी तो राजकीय धक्का होता? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने मला आनंदच झाला. कारण तोपर्यंत माझे आणि त्यांचे संबंध चांगले होते. १९९७-९८ पासून माझे एकनाथ शिंदेंशी मैत्रीपूर्णंच संबंध होते. आमची मैत्री उघडपणाने नव्हती. पण आम्ही पैशांच्या देवाणघेवाणीत नव्हतो. पण कधी एकमेकांना काही मदत लागली तर आम्ही जरुर मदत करायचो.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा मी म्हटलं होतं, ‘चला, आता हक्काचा माणूस आला त्यांच्या दारात जाऊन निधी मागू शकतो. तेव्हा माझ्या पक्षातील काही लोकांनी मला म्हटलं की, तू त्यांच्या दारात जाऊन निधी मागू, असं का म्हणालास? पण त्यात काय झालं. मतदारसंघासाठी कुणाच्या दारात जावं लागलं, तर हरकत आहे. आता हे (अजित पवार गट) विकासासाठी मोदींच्या दारात गेलेच ना.. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदेंच्या दारात गेलो, तर काय फरक पडतो. शेवटी मतदारसंघाच्या विकासासाठीच तर आपण आमदार असतो ना..” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

आता तुमचे एकनाथ शिंदेंबरोबर संबंध कसे आहेत? तुमचं बोलणं होतं का? यावर जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “आता माझी आणि त्यांची कधी भेटही नाही. चर्चाही नाही. फोनही नाही. माझ त्यांच्याकडे काही कामंही पडत नाही. त्यांच्याकडून निधी मिळणार नाही, ते आपल्याला सगळीकडून दाबण्याचा प्रयत्न करणार, आपल्याला मतदारसंघात काम करू देणार नाहीत, हे सगळं आपल्याला माहीत आहे. त्यामुळे उगीच त्यांच्या दारात जाऊन उभं कशाला राहायचं?

या कार्यक्रमादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी शिंदेंच्या बंडाबाबत गौप्यस्फोटही केला. ते म्हणाले की, शिंदे यांच्या बंडाबाबत ठाकरेंना पूर्वसूचना दिली होती. शिंदेंच्या बंडाची बीजे धर्मवीर सिनेमात असल्याचं ते म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com