Krishna Janmashtami 2025 : जन्माष्टीचा उपवास का करतात? त्यामागील कारणे कोणती जाणून घ्या...
Krishna Janmashtami Fast : भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा आनंद साजरा करणारा कृष्ण जन्माष्टमी उत्सव यंदा 15 आणि 16 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. द्रिक पंचांगानुसार, १६ ऑगस्टला जन्माष्टमीची राजपत्रित सुट्टी जाहीर करण्यात आली असून, देशभरात श्रीकृष्णाच्या 5252 व्या जन्मवर्षानिमित्त भव्य सोहळे पार पडतील. जन्माष्टमीच्या दिवशी अनेक भक्त उपवास करतात. हा केवळ अन्नत्यागाचा नव्हे, तर गोविंदाशी आत्मिक नातं जोडण्याचा मार्ग मानला जातो. हा उपवास मोक्षप्राप्तीशी म्हणजेच निर्वाणाशी निगडित असून, आत्म्याला परमेश्वराच्या अधिक जवळ नेतो असा विश्वास आहे. उपवास शरीर आणि मन शुद्ध करण्याचे, सांसारिक सुखांपासून दूर राहण्याचे प्रतीक मानला जातो.
या परंपरेची मुळे महाभारतात आढळतात. महाराज परीक्षित, भीष्मदेव आणि इतरांनी जीवनाच्या अखेरच्या दिवसांत आत्मिक चेतना वृद्धिंगत करण्यासाठी उपवासाचा मार्ग स्वीकारला होता. जन्माष्टमीच्या आधीच्या दिवशी एक वेळ जेवण करून दुसऱ्या दिवशी रोहिणी नक्षत्र आणि अष्टमी तिथी संपल्यावर उपवास सोडण्याची प्रथा आहे. यंदा अष्टमी तिथीची सुरुवात १५ ऑगस्ट रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी होईल. उपवास सकाळी संकल्पाने सुरू करून दिवसभर अन्नग्रहण टाळायचं असतं. धान्य खाणं टाळण्याचा नियम एकादशीसारखाच पाळला जातो. धर्मशास्त्रानुसार, यंदा पारणा वेळ १६ ऑगस्ट रात्री ९ वाजून ३४ मिनिटांनंतर आहे.
जन्माष्टमीचा मुख्य पूजनकाळ ‘निशीथकाल’ म्हणजे वेदकालीन मध्यरात्री आहे. यंदा हा १६ ऑगस्टच्या मध्यरात्री १२:०४ ते १२:४७ या ४३ मिनिटांचा असेल. याच वेळी गोपालाच्या जन्माची आरती, भजन आणि पूजन सोहळ्याने भक्तिमय वातावरण निर्माण होईल. भक्तांसाठी हा उपवास केवळ धार्मिक विधी नसून, श्रद्धा, संयम आणि आत्मिक उन्नतीचा दिव्य संगम ठरतो