Maharashtra Politics : नवनीत राणांचा पराभव नेमका का झाला? रवी राणांनी थेट केला खुलासा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Local Body Elections) रणधुमाळी राज्यामध्ये सुरु आहे. नगर पंचायत आणि नगर परिषदांची निवडणूक होत आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी यासाठी मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अमरावतीमध्ये देखील प्रचाराचा धुराळा उडाला आहे. आता युवा स्वाभिमानी पक्षाचे नेते आणि आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) हे चर्चेमध्ये आले आहेत. राणा दाम्पत्याने केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा आहे. नुकतेच एका सभेमध्ये रवी राणा यांनी नवनीत राणा यांच्या पराभवाचे कारण सांगितले आहे.
आमदार रवी राणा यांची अमरावतीत नुकतीच एक प्रचार सभा पार पडली. या सभेत त्यांनी लोकसभा निवडणुकीत पत्नी नवनीत राणा यांचा झालेला पराभव यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी नवनीत राणा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये का हरल्या याचे कारण देखील सर्वांसमोर आणले. विद्यमान खासदारांची कार्यशैली आणि स्थानिक आमदारांचा विकासकामांचा अनुभव या मुद्द्यांवरून रवी राणा यांनी ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांना लक्ष्य केले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अमरावती जिल्ह्याचे काय हाल झाले, हे सर्वांना माहीत आहे, असे म्हणत आमदार रवी राणा यांनी काँग्रेसचे विद्यमान खासदार बळवंत वानखडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.
पुढे रवी राणा म्हणाले की, नवनीत राणांचा पराभव झाल्यामुळे अमरावती जिल्ह्याचे काय हाल झाले हे सर्वांना माहीत आहे. आताच्या खासदाराचा अत्ता, पत्ता नाही. विकासाचा पत्ता नाही आहे, काम करणारी महिला खासदार नवनीत राणा तुमच्या आशीर्वादाने लढत होती. पण जातीपातीच्या राजकारणामुळे तिचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराचा पराभव झाला आणि दारूचा दुकान असलेला व्यक्ती निवडून आला, अशा शब्दात रवी राणा यांनी टोला लगावला आहे. तसेच नवनीत राणा यांच्या पराभवाचे कारण देखील सांगितले.
मी पुन्हा येईल – नवनीत राणा
अमरावतीमधील धारणी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील चोथमल आणि धारणीमधील भाजपच्या सर्व उमेदवारांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. यावेळी तिथे माजी खासदार नवनीत राणाया देखील उपस्थित होत्या. माजी खासदार नवनीत राणा यांनी मी पुन्हा येईन, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पुन्हा खासदार होण्याचा मानस व्यक्त केला. तर आमची माजी खासदार आता तुमच्या आशीर्वादाने माजी खासदार राहणार नाही, असे म्हणत नवनीत राणांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिलाय. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
