Uddhav Thackeray : नाशिकचा पालकमंत्री अजूनही नियुक्त का नाही? उद्धव ठाकरेंचा सवाल...

Uddhav Thackeray : नाशिकचा पालकमंत्री अजूनही नियुक्त का नाही? उद्धव ठाकरेंचा सवाल...

नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री अद्यापही नेमण्यात आलेला नाही. हा प्रश्न उपस्थित करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

नाशिक 2027 च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असताना नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री अद्यापही नेमण्यात आलेला नाही. हा प्रश्न उपस्थित करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. त्याचबरोबर तपोवन परिसरातील साधूग्रामसाठी होणाऱ्या 1800 झाडांच्या कत्तलीवरूनही त्यांनी सरकारला कडक शब्दांत सुनावले.

गिरीश महाजन यांची नियुक्ती 24 तासांत स्थगित, तिढा कायम

18 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक जिल्ह्यासाठी गिरीश महाजन यांची पालकमंत्री म्हणून घोषणा केली होती. मात्र शिंदे गटातील काही नेत्यांच्या विरोधामुळे अवघ्या एका दिवसात ही नियुक्ती स्थगित करण्यात आली. त्यानंतर अनेक महिने लोटूनही नाशिकचा पालकमंत्री कोण असेल, याबाबत स्पष्टता नाही. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे म्हणाले, “नाशिकसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचा पालकमंत्री का नेमला जात नाही? यात काहीतरी गडबड आहे. कुंभमेळ्याच्या प्रचंड खर्चातच त्याचे उत्तर दडले आहे का?”\

“कुंभमेळ्याची मोठी जबाबदारी, पण सरकारकडून दुर्लक्ष”

उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, पुढील वर्षी होणारा कुंभमेळा हा लाखो भाविकांचा धार्मिक सोहळा असून अशा विशाल आयोजनात सरकारने सजग असणे आवश्यक आहे. ते म्हणाले, “भाविक, साधू-संत यांची गैरसोय होऊ नये. सरकारचे काम सोयीसुविधांची पूर्तता करणे आहे. पण नाशिकमध्ये अजूनही पालकमंत्री नाही, हा प्रकारच संशय निर्माण करणारा आहे.” प्रयागराजमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, अशा दुर्घटना टाळायच्या असतील तर नियोजनात पारदर्शकता आणि जबाबदारी आवश्यक आहे.

तपोवनात साधूग्राम,परंपरा की पर्यावरणाचा बळी?

2027 च्या कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरातील 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्याची योजना आहे. त्यासाठी 1800 झाडे तोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये यामुळे संताप निर्माण झाला असून ठाकरे यांनीही या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, साधूग्रामाला आमचा विरोध नाही; पण तो तपोवनात उभारणे हा ऐतिहासिक आणि पर्यावरणाचा अपमान आहे.” “तपोवनाने अनेक कुंभमेळे पाहिले आहेत – त्याला नष्ट का करत आहात?” उद्धव ठाकरे यांनी तपोवनाचे धार्मिक आणि नैसर्गिक महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “प्रभू राम, सीता आणि लक्ष्मण यांच्याशी निगडित तपोवन ही पवित्र स्थळांपैकी एक आहे. शेकडो वर्षांपासून तो परिसर निसर्गमय आहे. विविध प्रकारची औषधी वनस्पती, झाडे तिथे आहेत. अशी जागा कापून टाकणे चुकीचे आहे.”

“एक झाड कापलं तर दहा लावू म्हणणाऱ्यांना प्रश्न, मग तिथेच का नाही उभारणार साधूग्राम?” गिरीश महाजन यांनी ‘एक झाड कापल्यास दहा झाडे लावू’ असे विधान केले होते. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, जर जागा इतकीच मोठी असेल आणि पर्यावरणपूरक काम करणार असाल, तर मागील कुंभमेळ्यात जिथे साधूग्राम झाला होता, त्याच जागेचा वापर का नाही करत? तपोवनावरच डोळा का?”

सरकारवर तीव्र प्रहार; राजकीय वातावरण तापले

नाशिकचा पालकमंत्री, कुंभमेळ्याचा निधी, तपोवनातील झाडांची कत्तल....या सर्व मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यांच्या या विधानांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधाण आले असून कुंभमेळ्याच्या तयारीवरून महायुतीतील अंतर्गत मतभेदही पुन्हा चर्चेत आले आहेत. आता सरकार नेमकी कोणती भूमिका घेते आणि तपोवनावरील कत्तलीचा निर्णय कायम राहतो की पुनर्विचार केला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com