Sanjay Raut On BJP : “मनोज जरांगेंची कुचेष्टा का केली जाते?” संजय राऊतांचा भाजप नेत्यांवर सवाल
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी सरकारचे कौतुक करत भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. जरांगे यांनी उपोषण सोडून उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, “मनोज जरांगे समाधानी असतील तर आम्हीही समाधानी आहोत. मराठा समाजाच्या वेदना सरकारने कमी केल्या असतील तर त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.”
राऊत पुढे म्हणाले की, “सरकारने जरांगे यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मान्य केल्या आहेत. पावसात आणि चिखलात आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या हे स्वागतार्ह आहे. जातीपातीच्या मुद्द्यावर कुणी भेदाभेद करु नये. मराठी माणसाची भक्कम एकजूट टिकली पाहिजे, हेच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार होते आणि आम्ही त्याच विचारांवर चालतो.”
भाजपाच्या काही नेत्यांकडून अजूनही जरांगे यांची खिल्ली उडवली जात असल्याचे सांगून राऊतांनी तीव्र शब्दांत भाजपवर टीका केली. ते म्हणाले, “उपोषणामुळे मनोज जरांगे यांचे प्राण धोक्यात आले होते. अशा वेळी त्यांना न्याय देणे आवश्यक होते. भाजपाने मात्र त्यांच्या आगमनाच्या वेळी द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भाजपा हा दुतोंड्या भूमिकेत वागणारा पक्ष आहे.”
तथापि, राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. “या संपूर्ण घडामोडीत फडणवीस यांनी संयम दाखवला. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो. पण कालच्या महत्त्वाच्या क्षणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार कुठे होते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “सरकारसमोर हायकोर्टाच्या आदेशामुळे जीआर काढण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता,” असेही त्यांनी स्पष्ट केले.