Why is there such a rush for the oath-taking ceremony after Dada's passing? What exactly did Anjali Damania say...
Why is there such a rush for the oath-taking ceremony after Dada's passing? What exactly did Anjali Damania say...

Anjali Damania : दादा गेल्यानंतर शपथविधीची इतकी घाई का? अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या...

राज्यातील राजकारणात अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर मोठी अस्वस्थता आणि वेगवान घडामोडी पाहायला मिळत आहेत. बुधवारी एका भीषण विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले.
Published by :
Riddhi Vanne
Published on

राज्यातील राजकारणात अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर मोठी अस्वस्थता आणि वेगवान घडामोडी पाहायला मिळत आहेत. बुधवारी एका भीषण विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले आणि संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. पवार कुटुंबीय, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. मात्र, या दुःखद घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांतच राजकीय हालचालींना अचानक उकळी फुटल्याचे चित्र आहे.

गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसकडेच महत्त्वाची खाती ठेवावीत, अशी आग्रही मागणीही करण्यात आली. दरम्यान, आज संध्याकाळी लोक भवनात सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे निश्चित झाले आहे.

मात्र, अजून दुखवटा संपलेला नसताना इतक्या घाईने शपथविधी का घेतला जात आहे, असा सवाल आता राज्यभरातून उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या संपूर्ण प्रकरणावरून मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. त्यांनी या शपथविधीमागील हेतूंवर गंभीर प्रश्न उपस्थित करत थेट भाजपवर निशाणा साधला आहे.

अजितदादा गेल्यानंतर शपथविधीची इतकी घाई का, यामागे कुणाचं राजकीय हित दडलं आहे, असा थेट सवाल अंजली दमानिया यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील हे कधीही भाजपवासी व्हायला तयार असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसला संपवण्याचा कट सुरू असून, त्यानंतर शिवसेनेलाही दाबले जाईल, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

भाजप राज्यातून सर्व प्रादेशिक पक्ष संपवण्याच्या तयारीत असल्याचा आरोप करत दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. वित्त खातं स्वतःकडेच का ठेवले आहे, फडणवीस स्वतःला सुपरमॅन समजतात का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यात आता नैतिकता उरलेली नाही, असेही परखड मत त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले असून ते सायंकाळी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे, पार्थ पवार यांनी गोविंद बागेत जाऊन शरद पवार यांची मनधरणी करत त्यांना शपथविधीसाठी आमंत्रण दिल्याचे समजते. या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

थोडक्यात

  1. राज्यातील राजकारणात अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर मोठी अस्वस्थता

  2. बुधवारी एका भीषण विमान अपघातात अजित पवार यांचे निधन

  3. संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली

  4. पवार कुटुंबीय, NCP नेते आणि कार्यकर्ते अजूनही धक्क्यातून सावरलेले नाहीत

  5. दुःखद घटनेनंतर केवळ दोन दिवसांत राजकीय हालचालींना अचानक उकळी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com