Aaditya Thackeray :  तपोवनमध्ये साधुग्राम का? आदित्य ठाकरेचा भाजपवर हल्लाबोल

Aaditya Thackeray : तपोवनमध्ये साधुग्राम का? आदित्य ठाकरेचा भाजपवर हल्लाबोल

नाशिकमध्ये 2027 च्या कुंभमेळ्याची तयारी सुरू असताना तपोवन परिसरातील साधुग्राम प्रकल्पामुळे जवळपास 1800 झाडे तोडली जाणार असल्याची माहिती समोर आल्याने मोठा विरोध होत आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

नाशिकमध्ये 2027 च्या कुंभमेळ्याची तयारी सुरू असताना तपोवन परिसरातील साधुग्राम प्रकल्पामुळे जवळपास 1800 झाडे तोडली जाणार असल्याची माहिती समोर आल्याने मोठा विरोध होत आहे. साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी 1150 एकरांवर साधुग्राम उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार आहे. याला शिवसेना (ठाकरे गट), मनसे, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना (शिंदे गट) तसेच पर्यावरणप्रेमी यांचा तीव्र विरोध आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी नाशिकमधील एका बिल्डरचा व्हिडीओ दाखवत भाजपवर थेट आरोप केले. त्यांनी सांगितले की, नाशिकच्या एका बिल्डरने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि साधुग्रामचा वापर करून ग्रीन झोनला यलो झोनमध्ये बदलता येईल, म्हणजेच जंगलाला रेसिडेन्शिअल झोन करता येईल आणि TDR वापरता येईल, असे सुचवल्याचे दिसते. या व्हिडिओत त्या बिल्डरसोबत नाशिक भाजपचा खजिनदार बसलेला असल्याचाही त्यांनी दावा केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, “तपोवनमध्येच साधुग्राम का? नागरिक इथे स्वच्छता मोहीम करत आहेत, पण भाजपला ही जागाच साफ करायची आहे. हा साधूंचा प्रकल्प आहे की TDR आणि खजिन्याचा खेळ?”

त्यांनी असा सवाल केला की हा बिल्डर नेमका कोण आहे आणि नाशिकचे भविष्यच या व्यवहारांमध्ये तर विकले जात नाही ना? ते पुढे म्हणाले, “आम्हाला साधुग्राम हवा आहे, तपोवनही हवं आहे. पण भाजपच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नको.”

ते म्हणाले की, नाशिक महानगरपालिका भाजपच्या हाती गेली तर संपूर्ण शहर विक्रीस काढण्याचा प्रयत्न होईल. झाडे तोडण्याच्या निर्णयावर स्थगिती असतानाही 700 झाडे कापणार, अशी धमकी दिली जात असल्याचाही त्यांनी आरोप केला. तपोवन परिसरातील झाडतोडीच्या या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले असून पुढील काही दिवसांत हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com