Ladki bahin yojana : ई-केवायसी नसेल तर लाभ थांबणार? आदिती तटकरेंचं लाडक्या बहिणींना स्पष्ट आवाहन
महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची आर्थिक आधार योजना ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, या योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व पात्र महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
आदिती तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू राहण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. सध्या अंतिम मुदतीला अवघे काही दिवस शिल्लक असून, सर्व लाडक्या बहिणींनी तातडीने आपली ई-केवायसी पूर्ण करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. यापूर्वी 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर मुदतवाढ देत 31 डिसेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली.
याशिवाय, ई-केवायसी करताना काही महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले गेले असतील, तर त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी देखील एकच संधी देण्यात आली आहे. ही दुरुस्ती प्रक्रिया देखील 31 डिसेंबरपर्यंत करता येणार आहे. त्यामुळे महिलांनी कोणताही विलंब न करता आपली माहिती तपासून योग्य ती दुरुस्ती करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, योजनेच्या हप्त्यांबाबत लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ऑक्टोबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता 3 आणि 4 नोव्हेंबर रोजी वितरित करण्यात आला होता. मात्र, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे एकीकडे ई-केवायसी पूर्ण करण्याची घाई, तर दुसरीकडे दोन महिन्यांच्या हप्त्यांची प्रतीक्षा अशी अवस्था अनेक लाडक्या बहिणींची झाली आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत 10 डिसेंबर रोजी दिलेल्या माहितीनुसार, त्या वेळेपर्यंत राज्यातील 1 कोटी 74 लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती. उर्वरित महिलांनीही तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, ज्या महिला पीएम किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना लाडकी बहीण योजनेतून दरमहा 500 रुपये दिले जातात. त्यामुळे पात्र महिलांनी ई-केवायसी वेळेत पूर्ण करून योजनेचा लाभ सुरू ठेवावा, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.
