महागडे मोबाईल रिचार्ज प्लान्स आता स्वस्त होणार? 'ट्राय'ने दिले महत्त्वाचे आदेश
यंदाच्या वर्षात सर्वच टेलिकॉम नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हाडरने आपले टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ केली. जवळपास सर्वच टेलिफोन कंपन्यांनी मंथली व्हॅलिडिटी प्लानमध्ये वाढ केली. मात्र, आता TRAI ने फक्त व्हॉईस कॉलिंग आणि SMS असलेले STV (स्पेशल टॅरिफ व्हाउचर) सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता Jio, Airtel, Vi आणि BSNL या टेलिकॉम कंपन्यांना आता फक्त SMS आणि व्हॉईस कॉलिंग प्लान ग्राहकांना उपलब्ध करून द्यावा लागणार आहे.
सध्या बाजारात ग्राहकांना सर्व्हिस व्हॅलिडिटीसह व्हॉईस कॉलिंग आणि SMS देणाऱ्या प्लानसाठी साधारण २०० रूपये मोजावे लागतात. त्यामुळे Jio आणि Airtel च्या ग्राहकांना फक्त सिम अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी सुमारे 200 रुपये खर्च करावे लागतात. देशात अजूनही अनेक युजर्स आहेत ज्यांना दीर्घकाळ वैधता हवी परंतु डेटा नको. अश्या ग्राहकांना विनाकारण डेटासाठी पैसे खर्च करावे लागत आहेत.
ट्रायने जारी केला नवा आदेश
TRAI नं सोमवारी 23 डिसेंबर 2024 रोजी नवा आदेश जारी केला आहे. ज्या आदेशानुसार टेलिकॉम कंपन्यांना ग्राहकांसाठी फक्त एसएमएस आणि व्हॉईस कॉलिंग असलेले प्लान्स सादर करावे लागणार आहेत. ज्यामुळे ग्राहकांना जी सेवा हवी आहे फक्त त्या सेवेसाठीच पैसे देता येतील. या आदेशाचा मोठ्या प्रमाणावर परिणाम टेलिकॉम कंपन्यांच्या महसुलावर होणार आहे.
'ट्राय'च्या आदेशामध्ये काय म्हटलंय?
ट्रायच्या वेबसाइटवर दिलेल्या STV च्या व्याख्येनुसार यासाठी एक अॅक्टिव्ह प्लॅन असणं आवश्यक आहे.
सध्या बहुतांश ग्राहक ऑनलाइन मोबाइल रिचार्ज करत असल्यामुळे व्हाउचर्सची कलर कोडिंग करणे बंधनकारक नाही, असं देखील ट्रायनं म्हटलं आहे.
तसेच आता टेलिकॉम कंपन्यांना टॉकटाइम व्हाउचर्स 10 ने पूर्ण भाग जाईल अश्या किंमतीत सादर करण्याची देखील गरज नाही, हा नियम देखील TRAI नं बदलला आहे. परंतु कंपन्यांकडे निदान एक तरी 10 रुपयांचा टॉप-अप व्हाउचर असावा, असं देखील सांगण्यात आलं आहे.
ट्रायनं STV आणि कॉम्बो व्हाउचरवरची 90 दिवसांची वैधतेची मर्यादा हटवली असून आता ही मर्यादा 365 दिवस करण्यात आली आहे. त्यामुळे जर फक्त एसएमएस आणि व्हॉइस कॉलिंग देणारे काही प्लॅन्स आले तर त्यांच्यासोबत आता एक वर्षाची वैधता मिळू शकते. त्यामुळे 'ट्राय'कडून याविषयी अधिक स्पष्टीकरण येणे अपेक्षित आहे. तसेच टेलिकॉम कंपन्यांना या निर्णयाबद्दल काय वाटते ते पाहावं लागेल.