Sanjay Raut : “आता मोदी शिंदेंकडून प्रेरणा घेणार का?”, संजय राऊतांचा खोचक सवाल

Sanjay Raut : “आता मोदी शिंदेंकडून प्रेरणा घेणार का?”, संजय राऊतांचा खोचक सवाल

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जयंती साजरी केली जात आहे. जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले
Published by :
Varsha Bhasmare
Published on

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जयंती साजरी केली जात आहे. जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, शिवसेनेचा महापौर व्हावा अशी मागणी जोर धरत असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ समाजमाध्यमावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे हे आपले मार्गदर्शक असल्याचे, त्यांच्याकडून प्रेरणा आणि ऊर्जा मिळाल्याचे नमूद केले होते. याच पोस्टवरून संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. “ज्या बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्याचे काम मोदी करत आहेत, त्याच बाळासाहेबांची शिवसेना भाजपने फोडली. शिवसेना प्रमुखांच्या जागी एकनाथ शिंदे यांना बसवण्यात आलं. आता मोदी शिंदेंकडून प्रेरणा आणि ऊर्जा घेतात का?” असा खोचक सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

यावेळी राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व आणि विचार अधोरेखित केले. “लोकमान्य टिळकांनंतर बाळासाहेब ठाकरे हे खरे लोकमान्य नेते होते. त्यांनी महाराष्ट्राला आणि देशाला एकजुटीचा विचार दिला. मराठी माणूस असो वा हिंदू समाज, ऐक्याची वज्रमूठ कोणत्याही संकटाशी लढू शकते, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले,” असे राऊत म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आज शिवसेनेतर्फे मुंबईतील षणमुखानंद हॉलमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. बाळासाहेबांनी सामान्य माणसाला शूर बनवले आणि त्याला न्यायहक्कांची जाणीव करून दिली, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिंदे गट–मनसे युतीच्या वादावर भाष्य करण्याचे संजय राऊत यांनी टाळले. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी दिनीच ठाकरे गट आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com