Beed Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांच्या आरोपीला सुटणार? रस्त्यावर हत्तीवर मिरवणुकीची अफवा; भावाचा संताप
(Beed Santosh Deshmukh Case) छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद खंडपीठात आज सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, न्यायव्यवस्थेवर त्यांचा पूर्ण विश्वास असून संतोष देशमुख यांना नक्कीच न्याय मिळेल. तसेच आरोपी सुटणार असून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली जाईल, अशा पसरवलेल्या अफवांकडे न्यायालय आणि संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष द्यावे आणि योग्य कारवाई करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
धनंजय देशमुख पुढे म्हणाले की, मुख्य आरोपीने जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर १२ डिसेंबर रोजी अंशतः सुनावणी झाली होती. उर्वरित सुनावणी आज होणार आहे. आज फिर्यादी आणि आरोपी पक्षाचे वकील आपले युक्तिवाद मांडणार आहेत. आम्ही न्यायाच्या बाजूने उभे आहोत आणि आम्हाला फक्त न्याय हवा आहे, या भावनेने आम्ही न्यायालयात आलो आहोत. एसआयटी, राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि न्यायालय या सर्वांवर आमचा विश्वास आहे आणि त्यांनी योग्य निर्णय घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आरोपींच्या बाजूने बोलणारे काही लोक अटक झाल्यापासूनच आरोपी सुटणार, जल्लोष केला जाणार अशा घोषणा देत आहेत. हा आमच्या कुटुंबावर दबाव टाकण्याचा आणि भीती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, मात्र असे काही घडणार नाही, असे धनंजय देशमुख यांनी ठामपणे सांगितले. राज्यातील विविध समाजघटक आणि सर्वसामान्य जनता देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभी आहे, कारण एका निरपराध व्यक्तीचा अत्यंत क्रूर पद्धतीने खून करण्यात आला आहे. दोषींना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. कायदा किती कडक आहे हे आरोपींचे समर्थन करणाऱ्यांना दाखवून दिले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
आज औरंगाबाद खंडपीठात वाल्मिक कराड यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. शुक्रवारी ही सुनावणी अपूर्ण राहिली होती, ती आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. या सुनावणीसाठी धनंजय देशमुख स्वतः न्यायालयात उपस्थित राहिले आहेत.
थोडक्यात
छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद खंडपीठात आज सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आपली भूमिका मांडली.
आम्ही न्यायाच्या बाजूने उभे आहोत आणि आम्हाला फक्त न्याय हवा आहे.

